। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय मुलाने 5 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, स्थानिकांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 5 वर्षीय चिमुरडी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी त्यांच्या शेजारी असलेल्या 16 वर्षीय मुलाने तिला गोड बोलून आपल्या घरात बोलावले. घरात बोलावल्यानंतर नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी रडत घरी आली व आपल्या आजीला सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी पाहिले असता, चिमुरडीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्त्राव थांबत नव्हते. स्थानिकांनी त्या मुलाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले व मुलीला कांदिवलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मुलीला तत्काळ उपचार न देता माहिती घेण्यात वेळ घालवला. त्यामुळे स्थानिकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, रक्तस्राव थांबत नसल्याने तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर, पोलिसांनी संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे. कांदिवली पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे लालजी पाडा परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संतप्त स्थानिक नागरिक आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.







