। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी दिवसभर पावसाने धुमाकूळ घातला. त्यानंतर मंगळवारपर्यंत दोन दिवस रेड अलर्ट इशारा हवामान खात्याने दिला आहे. या कालावधीत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. पोलादपूर, पनवेल, कर्जत, मुरुड, म्हसळा, खालापूर, माणगाव या सात तालुक्यातील पूरग्रस्त व दरडग्रस्त भागातील 11 गावे वाड्यांमध्ये 569 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये 160 कुटुंबांचा समावेश असून तालुका क्रीडा संकुल, अंगणवाडी, महानगरपालिका उर्दू शाळा मराठी शाळा व नातेवाईकांच्या घरी सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या पावसामध्ये 189 घरांचे, चार गोठे, रोहामधील बाळसई येथील एक मंदिर आणि महाडमधील विन्हेरे सुतार केन येथील शाळेचे नुकसान झाले आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पावसात पनवेलमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. तसेच एक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पोलादपूरमधील वडघर सोनारवाडी येथील सात नागरिकांना वडघर अंगणवाडीमध्ये स्थलांतरित केले आहे. पनवेल तालुक्यातील कातकरवाडीमधील 139 जणांना तालुका क्रीडा संकुल, भारत नगर, पटेल मोहल्ला येथील 164 जणांना पनवेल महानगरपालिकेच्या उर्दू शाळेत स्थलांतरित केले आहे. खालापूरमधील सुभाषनगर येथील 50 जणांना मराठी शाळेत, असे 229 जणांना निवारा केंद्रात स्थलांतरित केले आहे.
कर्जत तालुक्यातील शेलू केबीके नगर येथील 24, मुरुडमधील खारोडकुले येथील 57, खारीकवाडा येथील 30, नांदगाव आदिवासीवाडीमधील 13, शिगरेमधील 50 तसेच म्हसळा तालुक्यातील लीपरी वावेमधील 10, माणगाव तालुक्यातील लोणशी बौद्धवाडी येथील 25 असे एकूण 340 जणांना नातेवाईकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.
