आई कनकाई क्रिकेट संघ विजयी
| माणगाव | सलीम शेख |
तालुक्यातील शिव प्रतिष्ठाण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन माणगाव यांच्या सौजन्याने स्वराज्य क्रिकेट क्लब निळगुण यांनी कै. राहुल पांडुरंग गुगळे यांच्या स्मरणार्थ रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी अल्ताफदादा धनसे मैदान निळगुण फाटा याठिकाणी आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत आई कनकाई क्रिकेट संघ होडगाव कोंड यांनी प्रथम क्रमांक पटकावीत हा संघ रोख रुपये 10 हजार व आकर्षक सरपंच चषकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेचे उद्घाटन देगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच दिनेश गुगळे यांच्याहस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत उपविजेता ठरलेला सोमजाई वीर हनुमान क्रिकेट संघ विंचवली संघास रोख रुपये 7 हजार व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते रायगड वारियर क्रिकेट संघ हरवंडी कोंड संघास रोख रुपये 4 हजार व आकर्षक चषक तर चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आई सोमजाई क्रिकेट क्लब ढाळघर संघास रोख रुपये 4 हजार व आकर्षक चषक,स्पर्धेतील इतर वैयक्तिक बक्षिसांमध्ये उत्कृष्ठ फलंदाज विंचवली संघाचा किरण ढमाले, उत्कृष्ठ गोलंदाज विंचवाला संघाचा बंटी चाळके, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक होडगाव कोंड संघाचा अभिनव गोटेकर तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूसाठी दिला जाणारा मालिकावीर बक्षिसासाठी होडगाव कोंड संघाचा अष्टपैलू खेळाडू अल्केश शिगवण यांची निवड करण्यात आली या सर्वांना उपस्थित मोर्बा विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश गुगळे,पांडुरंग गुगळे, निळगुण ग्रामस्थ तसेच स्वराज्य क्रिकेट क्लब निळगुणचे पदाधिकारी व सभासद यांच्याहस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे मराठीतून धावते समालोचन अल्पेश महाडिक यांनी केले तर सुरज पाशिलकर व दर्शन सत्वे यांनी उत्कृष्ठ अशी पंचांची भूमिका निभावली. सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशाल गुगळे,विजय जुमारे,मयूर गुगळे,मनीष गुगळे,विक्रांत गुगळे,दक्षत गुगळे,संदेश जुमारे,निलेश गुगळे यांच्यासह स्वराज्य क्रिकेट क्लब निळगुणचे सर्व पदाधिकारी व सभासद तसेच निळगुण ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा उत्साहात पार पाडली.







