कोरोनाच्या दुसर्या लाटेने गेले तीन महिने भारतात हाहाकार माजला होता, आता पहिल्यांदाच देशातील दर दिवशीच्या रुग्णांची संख्या पन्नास हजारापेक्षा खाली आलेली आहे. सोमवारी केवळ 42 हजार 640 रुग्ण आढळले. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा लाख 66 हजारच्या आसपास आहे. तसेच देशातील पॉझिटिव्हिटीचा दर सलग पंधरा दिवस पाच टक्क्यांंच्या खाली आहे. याच सकारात्मक बातमीबरोबर तितकीच दिलासा देणारी गोष्ट म्हणजे देशात झालेले लसीकरण. सोमवारी लसीकरण सर्वांसाठी खुले करत असताना देशात एकाच दिवशी सर्वाधिक म्हणजे 85 लाख डोस देण्याचा विक्रम भारताने केला. एप्रिल महिन्यांमधील लसीकरण्याच्या टप्प्याशी याची तुलना केल्यास त्या काळात सुमारे 43 लाख डोस दिले जात होते व आता याची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. गेल्या शंभर वर्षात हवाई वाहतुकीमुळे आणि जग खूप वेगाने जवळ आल्यामुळे हा विषाणू अवघ्या मानवजातीला कधी नव्हे ते एकाच वेळी मृत्यूच्या दारात घेऊन आला. या अदृश्य शत्रूशी सामना करण्याचा मार्ग पहिल्या लाटेच्या वेळी केवळ सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे आणि हात धुणे हेच होते. परंतु आता त्याच्याशी सामना करण्यासाठी लशीचेही बळ प्राप्त झाले आहे. मात्र त्या घेतल्या गेल्या पाहिजेत, दिल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी त्या उपलब्ध होणे आणि त्याचबरोबर त्याबद्दलचे गैरसमज दूर होणे, हेही आव्हान अजूनही आपल्याकडे आहे. कारण समाज माध्यमातील खर्या-खोट्या वृत्ताने अशिक्षित लोक प्रभावित होतातच, परंतु अनेकदा सुशिक्षित म्हणवले जाणारे लोकही गैरसमजाच्या बळी पडतात. त्यामुळे हे पुन्हा एकदा सांगणे आवश्यक आहे की सध्या कोरोनाशी लढण्याचे दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे सामाजिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, हात धुणे आणि डबल मास्क वापरणे. किंवा दुसरा, आपल्या शरीरात या विषाणूने शिरकाव केला तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करणे, जे केवळ लसीमुळे शक्य आहे. आपण मास्क कसा वापरतो, सामाजिक अंतर राखून कसे वागतो हे दोन्ही लाटेच्या वेळी स्पष्टपणे पाहिले आहे. त्याच्यावर भरवसा ठेवून आपण या संकटाशी मुकाबला करू शकत नाही, हे आपण जाणले आहे. त्यामुळे आता याचा मुकाबला करण्यासाठी केवळ एकच मार्ग म्हणजे हे लसीकरण आहे. त्यामुळे वेगात लसीकरण करणे आणि त्यातून सर्वाधिक लोकांना या विषाणूपासून सुरक्षित करणे हेच सरकारचे प्रमुख ध्येय आहे. त्यातून या लसीकरण्याच्या मोहिमेने सोमवारच्या दिवशी 85 लाख लसी दिल्या गेल्या. अर्थात भारताचे आकारमान पाहता त्याची 130 कोटीहून अधिक असलेल्या जनतेचे प्रमाण पाहता, ते अपुरे आहे. पुरेशा लशी नाहीत या आघाडीवर आपला संघर्ष सुरूच आहे. मात्र त्या उपलब्ध होण्याचा वेग वाढला आहे. अमेरिकेनेही लसी देण्याचे कबुल केले आहे. आता प्रत्येकाने त्या घेण्याचा निर्धार करणे, त्या जसजशा उपलब्ध होतील, तशा त्या घेण्यासाठी पुढे येणे, त्यासाठी जनजागृती करणे आणि गावपातळीवर, पंचायत पातळीवर स्थानिक नेतृत्वाने पुढाकार घेऊन सर्वांचे लसीकरण होईल यासाठी योजना आखणे हा एक उत्तम मार्ग ठरेल. सध्या देशभरातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक कमी पातळीवर आली असली तरी महाराष्ट्र अद्याप सर्वाधिक रुग्ण आढळणारे राज्य आहे. सोमवारी देशभरातील रुग्णसंख्या 42 हजार होती, तेव्हा यातील महाराष्ट्रातील संख्या 6270 होती. त्यामुळे चालू आठवडा अखेरपर्यंत एकंदर रुग्णसंख्या जवळपास साठ लाखांच्या कडे जाईल. तशात डेल्टा आणि त्याचाही म्युटंट असलेला डेल्टा प्लस हेही प्रकार महाराष्ट्रात आढळून आले आहेत, अशी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. ती ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण असलेली राज्ये म्हणजे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू व आंध्रप्रदेश आहेत. त्यापैकी तीन महाराष्ट्राची शेजारील राज्य आहेत. दिल्लीबाबतची सकारात्मक बाब म्हणजे तेथे ज्या प्रमाणात कोरोनाने तीन महिन्यापूर्वी हैदोस घातला होता, येथे सोमवारी केवळ 90 रुग्ण सापडले आहेत. रुग्ण कमी झालेल्या ठिकाणी लॉकडाऊन उठवला जात आहे आणि लोक गर्दी करू लागलेले आहेत. त्यापैकी अनेकांचे लसीकरण झालेले नाही. तर अशा परिस्थितीत तिसर्या लाटेबद्दलची चिंता वाटणे साहजिक आहे.
परिस्थितीवर मात, तरीही

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: Editorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
by
Sanika Mhatre
March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
by
Sanika Mhatre
March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
by
Sanika Mhatre
March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
by
Sanika Mhatre
March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
by
Sanika Mhatre
March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
by
Sanika Mhatre
March 8, 2026