अलिबाग कारागृहात क्षमतेपेक्षा 289 टक्के अधिक भरणा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेली दोन वर्षे देशभरात कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे या कालावधीत संसर्ग वाढू नये, याकरीता कैद्यांना तात्पुरता जामीन व पॅरोलवर सोडण्यात आले होते. मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध हटविण्यात आले. त्यामुळे जामीन तसेच पॅरोलवर सोडलेल्या कैद्यांनाही जेलवापसी करावी लागली. सध्या राज्यातील कारागृहांमध्ये जवळपास 172 टक्के अधिक कैदी असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, क्षमतेपेक्षा अधिक कैदी असल्यामुळे शिक्षा भोगणार्यांची घुसमट होत आहे.
राज्यात मध्यवर्ती कारागृह 9, जिल्हा कारागृह 28, विशेष कारागृह 1, किशोर सुधारालय 1, मुंबई जिल्हा महिला कारागृह 1, खुले कारागृह 10, खुली वसाहत अशी एकूण 60 कारागृहे आहेत. 31 ऑगस्टपर्यंतच्या अहवालानूसार या कारागृहांची अधिकृत बंदीक्षमता 24 हजार 722 आहे. मात्र प्रत्यक्षात 42 हजार 577 कैदी कारागृहात असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण कैद्यांमध्ये सिद्धदोष बंदी 8 हजार 249, न्यायाधीन बंदी 34 हजार 117 व इतर 211 कैद्यांचा समावेश आहे.
कारागृहाचा विभागनिहाय विचार केल्यास मध्यवर्ती कारागृहांत सर्वाधिक कैदी आहेत. मध्यवर्ती कारागृहांची क्षमता 15 हजार 506 असताना येथे सध्या 29 हजार 228 कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये 28 हजार 429 पुरुष, 784 महिला तर 15 तृतीयपंथी कैदी आहेत.
बंदीक्षमतेपेक्षा अधिक कैदी असणारी कारागृहे
राज्यातील 17 कारागृहांमध्ये बंदी क्षमतेपेक्षा दुप्पट व त्यापेक्षा जास्त कैदी असल्याची माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये मुंबई मध्यवर्ती कारागृहात 442 टक्के, बुलढाण जिल्हा कारागृह 425 टक्के, ठाणे मध्यवर्ती कारागृह 396 टक्के, कोल्हापुर खुले कारागृह व कल्याण जिल्हा कारागृह 388 टक्के, नांदेड जिल्हा कारागृह 373 टक्के, सोलापुर जिल्हा कारागृह 366 टक्के, नाशिरोड खुले कारागृह 350 टक्के, अलिबाग 289 टक्के, येरवडा 283 टक्के, अहमदनगर 278 टक्के, जळगाव 273 टक्के, यवतमाळ 239 टक्के, नागपुर 236 टक्के, भायखळा 232 टक्के, सातारा 208 टक्के तर वर्धा कारागृहात 207 टक्के अधिक कैदी आहेत.
रायगड ओव्हर फ्लो
रायगड जिल्ह्यात तळोजा मध्यवर्ती कारागृह व अलिबाग जिल्हा कारागृह आहे. यामध्ये तळोजा कारागृहाची 15 हजार 506 कैद्यांची क्षमता असून प्रत्यक्षात 29 हजार 228 कैदी ठेवण्यात आले आहेत. तर अलिबाग जिल्हा कारागृहाची क्षमता 82 असून प्रत्यक्षात मात्र 237 कैदी ठेवण्यात आले आहे.
राज्यात 1700 महिला कैद
राज्यातील एकूण 42 हजार 577 कैद्यांमध्ये 1700 महिलांना कैद करण्यात आले आहे. यापैकी 335 महिलांना सिद्धदोष बंदी करण्यात आले असून 1364 महिलांना न्यायाधीन बंदी करण्यात आली आहे. तसेच इतरमध्ये 1 महिलेस कैद करण्यात आले आहे.
राज्यातील कारागृहांचा आढावा
- राज्यात एकूण कारागृहे 60
- कैदी ठेवण्याची क्षमता 24,722
- कारागृहातील प्रत्यक्ष कैदी 42,577
- सिद्धदोष बंदी 8249
- न्यायाधीन बंदी 34117
- इतर 211
अलिबाग जिल्हा कारागृहाची क्षमता 82 कैद्यांची असून सध्या या कारागृहात 225 कैदी आहेत. नवीन कारागृहाची कार्यवाही सुरु असून लवकरच ते पूर्णत्वास जाईल. या कारागृहात 4 रिक्त पदे असून त्याबाबतचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. कर्मचार्यांवर जास्तीचा भार असूनही कर्मचारी न थकता काम करीत आहेत.
रामचंद्र रनवरे
सिनिअर जेलर, जिल्हा कारागृह, अलिबाग