विहूर पुलाच्या संरक्षक भिंतीकडे दुर्लक्ष

। आगरदांडा । वार्ताहर ।
मुरुड या मुख्य रस्त्यावरील विहूर पुलाची संरक्षक भिंत बांधण्यासाठी एप्रिल महिन्यात मंजरी देण्यात आली होती. मात्र अद्यापही काम सुरु न झाल्याने ग्रामस्थांनी कमालीची नाराजी व्यक्त केली आहे. संरक्षक भिंत बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागने कोकण भवन येथून निधी मंजूर करून घेतला होता. परंतु तद्नंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊनही संबंधित ठेकेदाराने काम सुरु न केल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, संरक्षक भिंतीचे काम तातडीने सुरु न केल्यास रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नागरिकांनी बांधकाम विभागाला दिला आहे.

मागील वर्षाचा पाऊस पडल्यानंतर रस्ते दुरुस्त न केल्यामुळे यंदाच्या पावसात खड्ड्यांचे स्वरुप मोठे झाले आहे. विहूर येथील छोट्या पुलावरुन प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. या पुलाच्या उजव्या बाजूला मोठं-मोठे खड्डे तयार झाले आहेत. तर डाव्या बाजूला संरक्षक भिंत न बांधल्यामुळे अर्धाच रस्ता वाहतुकीस खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकी वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे वेळीच दखल न घेतल्यास खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्याने पाऊस थांबताच सर्वप्रथम विहूर पुलाची संरक्षक भिंतीचे तातडीने काम सुरु करावे. तसेच पुलापासून 50 मीटरचा रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला असून यावर कार्पेटचा थर टाकण्यात यावा, अशी मागणी विहूर ग्रामस्थांकडून होत आहे.

Exit mobile version