रत्नागिरीत मत्स्यविभागाची धडक कारवाई
रत्नागिरी | वृत्तसंस्था |
गेल्या काही दिवसांपासून आपली हद्द सोडून परराज्यातील फास्टर बोटी येऊन मासेमारी करत असल्याच्या तक्रारी स्थानिक मत्स्यव्यावसायिकांकडून होऊ लागली होती. या सगळ्या तक्रारीची गंभीर दखल मत्स्य विभागाकडून घेण्यात आली आहे. शनिवारी मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी दीप्ती साळवी व सागरी सुरक्षा रक्षक योगेश तोस्कर यांनी या अत्याधुनिक फास्टर बोटीवर धाडसी कारवाई केली आहे.
दरम्यान, दाभोळ बंदरासमोर 18-20 वाव परिसरात मासेमारी करणार्या परप्रांतीय नौका ‘जॉन लोरन्स’ नौकेला पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नौकवरील मासळीचा लिलाव करण्यात आला व मासळी रक्कम 35 हजार 550 रुपये रक्कम शासन जमा करण्यात आली.
मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी दिप्ती साळवी यांनी कागदपत्रे तपासण्यासाठी मत्स्य विभागाच्या बोटीजवळ बोलावले व मत्स्यव्यवसाय विभाग पथकाने बोटीत प्रवेश केल्यानंतर कागदपत्रे तपासण्याचे काम सुरु होते. या बोटीवरील वायरलेस यंत्रणा अधिकार्यांनी ताब्यात घेतली. याचवेळी आजूबाजूला असलेल्या अन्य परप्रांतीय बोतहरनी एकत्र वायरलेस वरून एकमेकांना माषसती देत कारवाई सुरू असलेल्या बोटीजवळ येऊन कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकार्यांसमोर समुद्रात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अधिकार्यांनी जोरात सायरन सुरु केल्यावर या दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार्या या बोटी जाग्यावरच थांबल्या.
विशेष म्हणजे ही मोठी कारवाई करताना कोणतेही पोलीस संरक्षण जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात आले नव्हते अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याच ठिकाणी पंचनामा करण्यात आला. कर्नाटकमधली बंगळरूतील ही बोट आहे. सदर नौकेला दाभोळ बंदरात जप्त करण्यात आली असून, सदर कामगिरी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी, दाभोळ दीप्ती साळवी आणि सागरी सुरक्षा रक्षक योगेश तोस्कर यांचा या पथकात समावेश होता.