माल ट्रक पलटी; चालकाविरोधात गुन्हा दाखल

। सांगोला । प्रतिनिधी ।
सांगोला ते जत रोडवर माण नदीजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालकाने दारूच्या नशेत भरधाव मालट्रक चालवून विद्युत पोलाला धडक दिली. या अपघातात ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. याप्रकरणी पो.कॉ. सागर पोपट देसाई यांनी मालट्रक चालक विजय अर्जुन राऊत, रा. निमगाव-केतकी, ता. इंदापूर, जि. पुणे याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 28 ऑगस्ट रोजी फिर्यादी हे सांगोला पोलीस ठाण्यात हजर असताना पोलीस ठाणे अंमलदार पो.हे.कॉ. बनसोडे यांनी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कळविले की, सांगोला ते जत जाणार्‍या रोडवर माण नदीवरील पुलाच्या अलीकडे 100 मिटर अंतरावरती क्र. एम.एच.12 एस. एक्स. 8018 हा मालट्रक पलटी झाला आहे. चालकाने त्याच्या ताब्यातील मालट्रक भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन दारुच्या नशेमध्ये मालट्रक चालवून रस्त्याच्या बाजुला असलेल्या एम.एस. ई.बी च्या इलेक्ट्रीक पोलला धडक देऊन पोलला धडक दिली. या अपघातात चालक किरकोळ जखमी असून, विद्युत पोलचे व मालट्रकचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Exit mobile version