नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कृषी विधेयकांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चातर्फे सोमवारी ( 27 सप्टेंबर) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष करुन राजधानी दिल्लीत या बंदचे पडसाद जोरात उमटले. या बंदला राजकीय पक्ष, कामगार संघटना, शेतकरी संघटनांसह बँकिंग संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी-लेनिनवादी) यांच्यासह महाराष्ट्रात शेकाप आणि अन्या डाव्या पक्षांनी बंदला जाहीर पाठिंबा दिल आहे.
याबाबत डाव्या पक्षांच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकात कृषी कायदे हटवणे आणि शेतमालाला किमान हमीभाव कायदाच्या मागणीसाठी सुरु असलेला ऐतिहासिक शेतकरी संप 10व्या महिन्यात पोहोचला आहे. यामुळं आता भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी शेतकर्यांच्या मुद्यांवर या बंदला पाठिंबा द्यावा, असं या पत्रकात म्हटलं आहे.
संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली
शेतकर्यांनी गाझीपूर बॉर्डर, केएमपी, दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वे देखील रोखले. यामुळे दिल्ली आणि नोएडा गाझियाबादला जोडणार्या राष्ट्रीय महामार्गांवरही प्रचंड वाहतूक कोंडी झाली. दिल्ली पोलीस, गाझियाबाद पोलीस आणि नोएडा पोलिसांनी देखील वाहतुकीसंदर्भात स्वतंत्र सूचना जारी केल्या होत्या, परंतु सर्वत्र जाम असल्याने संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले.
दिल्ली-गुरुग्राम सीमेवर गाड्यांच्या लांबलचक रांगा दिसून आल्या. शेतकर्यांनी कुंडली मानेसर द्रुतगती महामार्गही रोखला आहे. गाझीपूर सीमेवरील वाहतूक बंद झाल्याने नोएडा, गाझियाबादहून दिल्लीकडे जाणार्या लोकांवर परिणाम झाला. शेतकर्यांनी दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे दिल्लीच्या गाझीपूर बॉर्डरवर रोखला. एनएच -9 आणि एनएच -24 वरही शेतकर्यांनी तीव्र जाम केला आहे. त्याचवेळी हरियाणाच्या बहादूरगढ येथील रेल्वे स्टेशनवर शेतकरी रेल्वे ट्रॅकवरही बसले, ज्यामुळे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
विरोधी पक्षांकडून पाठिंबा काँग्रेस नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह देशातील अनेक विरोधी पक्षांनी शेतकर्यांच्या या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
जोपर्यंत नवे कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेऊ. यासाठी 10 वर्षे लागली तरी चालतील.
राकेश टिकैत,शेतकरी नेते
शेतकर्यांचा अहिंसक सत्याग्रह अखंडपणे सुरू आहे. मात्र, शेतकर्यांचं शोषण करणार्या सरकारला हे आवडत नसल्यानं हा भारत बंद आहे.
राहुल गांधी,काँग्रेस नेते
शेतकरी दगावला
आंदोलनादरम्यान एका शेतकर्याचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर अधिक तपशील शेअर केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.





