राष्ट्रीय एकतेचा संदेश देत कळंबोलीत ‌‘रन फॉर युनिटी‌’

। कळंबोली । प्रतिनिधी ।

राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त कळंबोली येथे ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हिंदू समाज परिषद, कळंबोली यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात सुमारे 1500 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

रविवारी (दि.1) सकाळी 6.30 वाजता रोडपाली बस डेपो येथून या दौडीला सुरुवात झाली. उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झालेल्या या दौडीचा समारोप महाराष्ट्र ज्ञानमंदिर शाळा येथे झाला. यामध्ये विविध गृहनिर्माण सोसायट्या, रहिवासी संघटना, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना तसेच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशाप्रती असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल हिंदू समाज परिषद, कळंबोलीच्या आयोजकांनी सर्व सहभागींचे आभार मानले. भविष्यातील सामाजिक कल्याण आणि राष्ट्र उभारणीच्या उपक्रमांमध्येही नागरिकांनी असाच सहभाग व सहकार्य द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Exit mobile version