पालिका करणार 5 कोटी खर्च
| पनवेल | प्रतिनिधी |
खारघरमधील नागरिकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी ओवे येथील धरण पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. याकरता जवळपास 5.08 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या धरणाचे पूनरुज्जीवन करण्याची तसेच पांडवकडा येथून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करण्यासाठी धरण बांधण्याची मागणी माजी नगरसेवक आणि पाणीपुरवठा समितीचे माजी सभापती निलेश बाविस्कर यांनी पालिकेकडे केली होती. बाविस्कर यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिकेच्या या निर्णयामुळे ओवे धरणाच्या जवळपासच्या गावांना तसेच खारघर शहरातील काही रहिवासी संस्थांना 0.75 एमएलडी ते 1.5 एमएलडी पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे मत बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे. खारघर वसाहतीलगत असलेल्या ओवे गावात 0.16 दश लक्ष घनमीटर एवढ्या क्षमतेचे लहान धरण आहे. महापालिका स्थापनेपूर्वी तळोजा ग्रामपंचायतीचे हे धरण होते. 1962 साली बांधण्यात आलेल्या या धरणातून तळोजा ग्रामपंचायतमधील नागरिकांना पाणी पुरवण्यात येत होते. पालिकेच्या स्थापनेनंतर रायगड जिल्हा परिषदेने या धरणाकडे दुर्लक्ष केल्याने धरनातील पाणी वापराविना वाया जात होते. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवे धरण खोलीकरणाचा सध्या कोणताही प्रस्ताव नसला तरी धरण पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
याकरता होणार निधीचा वापर
पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून 20 अश्वशक्तीचा सबमर्सिबल पंप, 350 मीटर लांब आणि 150 मिमी व्यासाची कच्च्या पाण्याची पाईपलाईन, 1.5 लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि 1.740 किलोमीटर लांबीची 200 मिमी व्यासाची पाईपलाईनसोबत एक पॅनेल चेंबरचा समावेश आहे.





