मॉडेलमध्ये प्रथम क्रमांक
| म्हसळा | वार्ताहर |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा पाष्टीनें तालुका विज्ञान प्रदर्शनात आपली विजयी पताका फडकावली. दि.8 व 9 डिसेंबर 2023 रोजी तालुका विज्ञान प्रदर्शन आयडियल इंग्लिश स्कुल म्हसळा येथे पार पडले. उदघाटन सत्रात तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक संदीपान सोनवणे, गट विकास अधिकारी भोगे साहेब, गटशिक्षणाधिकारी संतोष दौड, आयडियल शाळेचे सचिव नाझिमभाई हसवारे व इतर अनेक मान्यवर उपास्थित होते. शाळेचे विज्ञान शिक्षक विनयकुमार सोनवणे यांनी तालुका विज्ञान मंडळाचा अध्यक्ष म्हणून संपूर्ण नियोजनात पुढाकार आणि सक्रिय सहभाग घेतला, तर समारोप दिवशी भाभा आटोमिक रिसर्च सेंटरचे संतोष टकले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी शाळेचे विदयार्थी व शिक्षक उपास्थित होते.
विज्ञान मॉडेल 9 वी ते 12 वी गटातून अक्षरा बोर्ले व आर्या कांबळे यांच्या विज्ञान प्रतिकृतीचा तृतीय क्रमांक आला. तर निबंध स्पर्धा 6 ते 8 गटातून अंश खामकर व 9 ते 12 गटातून आर्या कांबळे या विदयार्थिनीने तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले. या विज्ञान प्रतिकृतीसाठी मुख्यध्यापक माळी यांनी मार्गदर्शन केले. माध्यमिक गटातून शाळेचे विज्ञान शिक्षक विनयकुमार सोनवणे यांच्या डायलिसीस मशिन प्रतिकृतीला प्रथम क्रमांक देण्यात आला. शाळेचे शिक्षक प्रफुल्ल पाटील, शिकलगार यांनी देखील विद्यार्थ्याना घेऊन या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता.
शाळेच्या यशाबद्दल संस्था कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी शाळेचे कौतुक केले. स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन शांताराम कांबळे, राजाराम धुमाळ, जगजीवन लाड, राजाराम दिवेकर, प्रकाश लाड, चंद्रकांत पवार यांनी देखील मुख्याध्यापक सुदाम माळी विद्यार्थी व शाळेचे अभिनंदन केले.





