पाच्छापूर ते दर्यागाव रस्त्याचे काम अपूर्ण

पावसाळ्यात करावा लागणार चिखलातून प्रवास

। पाली । वार्ताहर ।

पाऊस डोक्यावर असताना देखील पाच्छापूर ते दर्यागाव रस्त्याचे काम अपूर्णच असल्याने यंदा मात्र येथील नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागणार असल्याचे स्पष्ठ चित्र दिसत आहे.

पाच्छापूर ते दर्यागाव या साडेतीन किमी पर्यंतच्या मार्गासाठी महाराष्ट्र रस्ते ग्रामीण विकास मंडळातून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 2 कोटी एवढा निधी उपलब्ध झाला आहे. सदरचे काम सिद्धीविनायक कंपनीच्या नावे असून पोट ठेकेदार आर.डी कंस्ट्रक्शन यांनी हाती घेतले आहे. गेली काही महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु, रस्त्याचे काम हे अतिशय धीम्या गतीने चालले असून पावसाळा सुरुवात झाली असून सुद्धा अद्यापदेखील हे काम अपूर्णच आहे.

पाच्छापूर ते दर्यावर या मार्गावर पंचशीलनगर पाच्छापूर व दर्यागाव ठाकूरवाडी अशी मोठी लोकसंख्या असलेल्या दोन वस्त्या आहेत. याठिकाणाहून शाळकरी विद्यार्थी, नोकरीसाठी व व्यावसायिक पाली व इतर ठिकाणी जात असतात. परंतु, सदरच्या रस्त्यावर ठेकेदाराकडून फक्त खडीकरण करुन त्यावर माती भराव करण्यात आला आहे. त्यामुळे या पाऊसकाळात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. परिणामी अशा चिखलातून याठिकाणी येणारी एसटी महामंडळाची बस ही येणं बंद होईल व विद्यार्थी, वृद्ध, आजारी व्यक्ती तसेच प्रवाशांना चिखलातून वाट काढीत प्रवास करावा लागेल. परंतु, या भयानक परिस्थितीच गांभीर्य प्रशासनाला व ठेकेदाराला अजिबात दिसत नाही. प्रशासन व संबंधित अधिकारी सदर ठेकेदाराला दिरंगाई झालेल्या कामाबाबत कोणताही जाब विचारण्यास का तयार नाही? ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे येथील नागरिकांचे जीवनमान कोलमडणार असून देखील यावर कोणीही राजकीय मंडळी भाष्य करण्यास का तयार नाहीत? असा संतप्त सवाल येथील नागिकांकडून केला जात आहे.

पंचशीलनगर पाच्छापूर व दर्यागाव येथील नागरिक रस्ता तयार होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र रस्त्याची परिस्थिती बघून यंदा चिखलातून पायी प्रवास करावा लागणार असेच दिसते आहे. याठिकाणी पंचशील नगर बौद्धवाडी व दर्यागाव ठाकूरवाडी अशी दुर्बल घटकातील लोक राहत आहेत म्हणून याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? इतर ठिकाणी प्रशासन व राजकीय मंडळींकडून कामासाठी पाठपुरवठा केला जातो मग आम्ही यापासून वंचित का? कोणीही अधिकारी या गंभीर परिस्थितीकडे बघण्यास तयार नाही.

सिद्धांत गायकवाड,
युवा सचिव, सुधागड आरपीआय.
Exit mobile version