पाचूरी संघाची भेंडखळवर मात

श्रेयस गोवरीचं दमदार शतक
| रायगड | प्रतिनिधी |
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. अ‍ॅड. शिरीष पाटील स्मृतीचषक ज्युनिअर गटाच्या लेदर बॉल एकदिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी एकाच सामन्यात भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज जिदनेश म्हात्रे व पाचूरी क्रिकेट अकॅडमी कामोठे संघाचा श्रेयस गोवारी यांनी स्पर्धेतील दुसरे व तिसरे शतक आपल्या नावावर नोंदविले. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात पाचूरी क्रिकेट अकॅडमी कामोठे संघाने भेंडखळ संघावर विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या भेंडखळ संघाने 40 षटकांत गडी गमावत 254 धावसंख्या उभारली. अर्णव पाटीलने 54, तर मधल्या फळीतील डावखुरा आतिशी फलंदाज जिदनेश म्हात्रे याने स्पर्धेतील दुसरे शतक ठोकले. त्याने 99 चेंडूंचा सामना करत 16 चौकार व 1 षटकार मारत 106 धावा काढल्या. पाचूरी संघाकडून आदित्य पांडे याने 4 व अनिष म्हात्रे यांनी 2 फलंदाज बाद केले. पाचूरी क्रिकेट अकॅडमी संघाने 254 धावसंख्येचा पाठलाग करताना सुरवातीचे फलंदाज लवकर बाद झाले. मधल्या फळीत श्रेयस गोवारीने धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद 104 चेंडूंमध्ये 16 चौकार व 2 षटकार ठोकत 104 धावांची मोलाची खेळी करत स्पर्धेतील तिसरे शतक ठोकले व संघाला विजय मिळवून दिला. त्याला अनिष म्हात्रेने 54 धावा काढून दिली.

भेंडखळ संघाकडून अर्णव पाटीलने 2 गडी बाद केले. सामन्याचा सामनावीर म्हणून शतकी खेळी करणारा श्रेयस गोवारी, स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू जिदनेश म्हात्रे, ईमर्जिंग प्लेअर अर्णव पाटील व अनिष म्हात्रे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रज्वल गोवारी यांना झुंझारचे सचिव किशोर तावडे, प्रवीण टेमकर, शंकर म्हात्रे, अजय टेमकर, रुपेश पाटील, विजय पवार, विरु अमित पाटील, संकेश ढोळे, आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version