अति पावसामुळे भातशेती धोक्यात

। चिरनेर । वार्ताहर ।

उरण तालुक्यासह चिरनेर परिसरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यात मागील आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकर्‍यांच्या पिकासाठी हा पाऊस हानिकारक ठरत आहे. उशिरा लागवड झालेली शेती आता कुठे बहरत असताना भात पिकांना पावसाचा तडाखा बसत आहे.

भात पिकांमध्ये पावसाचे पाणी जाऊन पोटरीला आलेले भात पोचट राहण्याची शक्यता असल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतातील भात पीक पाऊस कोसळत राहिला तर आडवे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.

जून महिन्यात बरेच दिवस पाऊस गायब झाला होता. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यानंतर शेतकर्‍यांनी भात पिकांच्या लागवडीला सुरुवात केली; परंतु काही ठिकाणी भात रोपे तयार नसल्यामुळे भाताची लावणी करण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडला. दरम्यान, कमी अधिक पडणारा पाऊस गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला. पावसाच्या अनियमितपणामुळे यंदा तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. जोराच्या पावसाबरोबर वारादेखील असल्याने भाताचे पीक शेतात कोसळून पडेल, याची भीती देखील शेतकर्‍यांना वाटत आहे.

Exit mobile version