तळेगावात भातशेती पिकण्याआधीच सुकली

पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणाचा शेतीला फटका
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील तळेगाव येथील भातशेतीला एक महिन्यापासून कालव्याचे पाणी मिळाले नसल्याने ही भातशेती पिकण्याआधीच सुकली आहे. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्त होत आहे. कधी निसर्ग कोपतो तर कधी अधिकार्‍यांचे दुर्लक्ष यामुळे शेती पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. आई जेवू घालीना आणि बाप भिक मागू देईना अशी द्वंध अवस्थेत शेतकरी अडकला आहे. या कालव्याला पाणी पाटबंधारे खात्याने त्वरित न सोडल्यास माणगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला घेराव घालू असा सणसणीत इशारा तेथील शेतकरी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सरपंच निलेश म्हात्रे यांनी दिला आहे.
तळेगाव मधील शेतकर्‍यांना महिन्याभरापासुन कालव्याचे पाणी न मिळाल्याने माणगाव तालुक्यातील तळेगाव येथील शेकडो एकर शेती धोक्यात आली असून हे पिक सुकले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा लेखी निवेदनातून पाटबंधारे विभागाला देत चांगलेच धारेवर धरले. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये दुबार शेती केली जाते. उन्हाळ्यात येथील शेतकरी काळ प्रकल्पाच्या कलव्याच्या पाण्याचा वापर करून भाताची शेती करतो. गेल्या महिन्याभरापासुन येथील कालव्याला पाणी सोडले गेले नसल्यामुळे तळेगावातील शेकडो एकर भातशेती पिकण्या आधी सुकण्याच्या मार्गावर असून येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रकल्प अधिकार्‍यांना भेटून कालव्याला पाणी सोडले जात नाही. अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळेच शेती सुकत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे असून वेळेत पाणी सोडले नाहीतर आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.

Exit mobile version