| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात भातशेती लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. सध्या बळीराजा भात शेती लागवडीच्या कामात व्यस्त असून, येत्या चार दिवसात तालुक्यातील लावणीची कामे पूर्णत्वास जातील. अशी माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावून पुन्हा मध्येच दडी मारल्याने शेतीच्या कामात अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेतकऱ्यांना धूळ वाफेवरची पेरणी करताच आली नाही. बहुतेक शेतकऱ्यांनी चिखल पेरा केला होता. यंदा पावसाने चांगलेच रंग दाखविल्याने शेतकऱ्यांना दुबार- तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे भात रोपे लावणी योग्य तयार होण्यास अडथळे निर्माण झाले. भात लागवडीच्या कामांना सुरुवात झाल्यावर पावसाने मध्येच पुन्हा दडी मारली. त्यामुळे शेतात पुरेसे पाणी नसल्यामुळे भात लागवडीच्या कामांना अपेक्षित गती मिळत नव्हती. अखेर मंगळवारी (दि.11) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भात लागवडीच्या कामांना पुन्हा एकदा गती आली. सध्या भात लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, येत्या चार दिवसात तालुक्यात लावणीची कामे पूर्णत्वास जातील असा अंदाज येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी वर्ग सामूहिक शेतीकडे वळला असून, तालुक्यात भातशेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा शेतकरी वापर करत, चारसूत्री भात लागवड, सामूहिक शेती भात लागवड, बचत गटाने केलेली सामुहीकरीत्या लागवड अशा प्रकारच्या पद्धतीने येथील शेतकऱ्यांनी भात शेतीची लागवड केली आहे. या तंत्रामुळे अनेक दृष्टीने वेळ व मजुरांची बचत होते. त्याचबरोबर उत्पादनात वाढ होत असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.
भातशेती लागवडीची कामे अंतिम टप्प्यात
