| खांब | प्रतिनिधी ।
कोकण प्रांत हा भातशेतीसाठी विशेष प्रसिद्ध असून, रायगड जिल्ह्याची ओळख तर ‘भाताचे कोठार’ म्हणून केली जाते. मात्र, यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने भातशेतीची विविध कामे दिरंगाईने झाली आहेत. त्यातच सध्या पावसाचा जोरही म्हणावा तसा नसल्याने भातशेतीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.
भात लागवडीसाठी वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाऊस पडणे अत्यंत आवश्यक असते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे यंदा शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने शेतीची मशागत, रोपवाटिका, भातलावणी आदी कामांचे नियोजन विस्कळीत झाले. अनेक ठिकाणी भातलावणीची कामे अपेक्षेपेक्षा उशिराने पूर्ण झाली. सध्या भातपीक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असताना पावसाचा जोर कमी असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पावसाचे प्रमाण असेच कमी राहिले, तर भात पिकाच्या वाढीवर तसेच अंतिम उत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी भातशेतीवर अवलंबून आहेत. भाताचे उत्पादन कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होणार आहे. आधीच शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि इतर खर्चात वाढ झाली असताना उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास यंदाचा भातशेतीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीचा ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वरुणराजाने कृपादृष्टी करावी आणि भातशेतीला आवश्यक असा समाधानकारक पाऊस पडावा, अशी अपेक्षा रायगड जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
पावसाअभावी भातशेती संकटात; शेतकरी चिंतेत
