ग्रामपंचायतीची कारवाई कागदावरच
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला असून, ही जनावरे शेतातील उभी पिके नष्ट करीत आहेत. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या अन्नाची नासाडी होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याची मागणी येथील संतप्त शेतकर्यांनी केली आहे.
बोर्लीपंचतन शहरासह आजूबाजूच्या गावातील नागरीक मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे अगोदरच हैराण असताना आता शेतकरी या जनावरांमुळे त्रस्त झाले आहेत. ही जनावरे दिवसभर शहरात रोडवर व रात्री शेतातील पिकांचे नुकसान करत आहेत. दिवसेंदिवस या जनावंराची संख्या वाढत आहे. सबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील गुरांचा बंदोबस्त करण्यात येत नाही. बोर्लीपंचतन-दिवेआगर रस्त्यालगत असणार्या शेतीमध्ये ही मोकाट जनावरे कळपाने फिरून शेतातील उभे पिक फस्त करीत आहेत. यावर्षी भात पिकांची परिस्थिती चांगली असतानाच, सर्वच पिक हातची गेली आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतीचे नुकसान झाल्याने उत्साहावर विरजण पडले आहे. उरली सुरली पिके आहेत तीही मोकाट जनावरे अशा पद्धतीने नष्ट करीत आहेत.
बोर्लीपंचतन ग्रामसेवकांकडे निवेदन
समाधानकारक पावसामुळे भातशेती पसवून लोंबी वर आली आहे. अनेक ठिकाणी शेती कापण्यायोग्य झाली आहे. अशा परिस्थितीत मोकाट जनावरे शेतीमध्ये घुसून पिकलेली भातशेती आडवी करत आहेत. शेतकरी सुधाकर कांबळे, संतोष कांबळे व जयवंत कांबळे यांनी बोर्लीपंचतन ग्रामसेवकांकडे या जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.