पाऊस कमी असल्याने चिंतेत वाढ
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
जून महिन्यातच पावसाने उशिराने सुरवात केली. नंतर उत्तम अशी मेघराजाने सुरवात करताच बळीराजा सुखावला होता. मात्र पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतातील पिक करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतातील पिक हातचे जाणार असल्याने बळीरजा मात्र चांगलाच धास्तावला आहे. सुरवातीपासूनच हवामान खात्याने पाऊस कमी असल्याचा अंदाज व्यक्त केला होता, तर जून महिन्याअखेर दमदार पावसाची सुरुवात तर जुलै महिना उजाडताच पावसाने दमदार बरसुन पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवली.
काही शेतकऱ्यांची तर अक्षरशः लागवडीसाठी उखडून ठेवलेले रोप हे वाहून गेले तर जे काही तरले त्या रोपांची लागवड केली. मात्र पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने शेतात लावलेले पीक हे पावसाअभावी कोरडे पडल्याने बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. इतिहासात रायगड हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. रायगड सह कोकणात भात पिकावर जगणारे असंख्ये शेतकरी आहेत. गेली काही दिवसांपासून अधिक पावसाने मारलेल्या दांडीमुळे बळीराजा धास्तवला आहे तर दुसरीकडे हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज दर्शवला असल्याने शेतकऱ्यांची अधिक चिंता वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे लागवड केलेले रोपटे पाण्याच्या अभावामुळे सुकून गेले आहे, तसेच जमिनीला भेगा देखील पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अधिक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.