जिल्ह्यातील भातशेती गेली वाहून

746 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान

| रायगड | प्रतिनिधी |

मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. लावलेली रोपे पाण्याखाली राहिल्याने कुजली आहेत, तर डोंगराळ भागात काही ठिकाणी भातशेतीत माती, चिखल वाहून आला आहे. पावसाचा जोर ओसरल्यानंतर झालेले नुकसान दिसू लागले आहे. कृषी विभागाने केलेल्या नजरपाहणी अहवालात 746 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे, तर काही तालुक्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. रायगड जिल्ह्यातील नुकसानीचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असून राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

रायगड जिल्ह्यात अद्याप काही तालुक्यांमधून नजरपाहणी अहवाल आलेला नाही. मात्र, ज्या तालुक्यातील अहवाल आला आहे, त्यानुसार राज्य सरकारने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानभरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांच्या मदतीने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून अहवाल सादर करावे लागणार आहेत. पेण, अलिबाग, रोहा, महाड या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांपासून सखल भागातील भातशेतीत पाणी साचले आहे. नुकतेच लावलेली रोपे कुजल्याने दुबार लावणीचे संकट ओढवल्याचे शेतकरी सांगतात. बुधवार, गुरुवारी पावसाचा जोर कमी झाल्यावर खलाटीतील पाणी कमी होऊ लागल्याने झालेले नुकसान दिसू लागले. याचबरोबर खालापूर, कर्जत, सुधागड, माणगाव या तालुक्यांमध्येही भातशेतीचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 15 पैकी 12 तालुक्यांमधील नजर पाहणी अहवाल सादर झाले आहेत. यात 746.32 हेक्टर क्षेत्रातील भातशेती प्रामुख्याने बाधित झाली आहे. यात जवळपास 2946 शेतकऱ्यांना झळ बसली आहे. प्रत्यक्ष स्थळ पाहणीत हे प्रमाण काही पटीने वाढण्याची शक्यता आहे. लवकरच नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात होईल.

शेतीचे नुकसान ठरवण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी, जेणेकरून ही नुकसानभरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी, असा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसानभरपाईच मिळणार आहे. 1 जुलै रोजी यासंदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत, सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक (एनडीव्हीआय) निकषासाठी जोपर्यंत कृषी विभागामार्फत अद्ययावत प्रणाली तयार होत नाही, तोपर्यंत प्रचलित धोरणांप्रमाणे शेतीपिकांची नुकसानभरपाई देण्याबाबत निर्णय झाला आहे.

श्रीवर्धन, म्हसळा, मुरूड, पोलादपूर, सुधागड या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. डोंगरउतारावरील शेतीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती, दगडगोटे वाहून आल्याने मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे नोंदवल्या आहेत. त्याचबरोबर भातशेतीची बांधबंदिस्तीची प्रवाहामुळे मोडतोड झाली आहे. पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यात असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाल्याने पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना या दुर्गम भागातही जावे लागणार आहे. पेण तालुक्यातीह जोहे, हमरापूर, वडखळ, अलिबाग तालुक्यातील शहापूर, धेरंड, मानकुळे, बहिरीचा पाडा या परिसरातील खाऱ्या जमिनीतील भातशेतीत 20 दिवसांहून अधिक काळ पाणी साचून राहिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना लावणीची कामे पूर्ण करता आली नाही. राबही खराब झाल्याचे या परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

अलिबाग तालुक्यातील 24 गावांमधील 187 शेतकऱ्यांची 57.70 हेक्टर, पेण तालुक्यातील 28 गावांमधील 659 शेतकऱ्यांची 215.00 हेक्टर, मुरूड तालुक्यातील 39 गावांमधील 654 शेतकऱ्यांची 51.00 हेक्टर, कर्जत तालुक्यातील 2 गावांमधील 2 शेतकऱ्यांची 00.29 हेक्टर, खालापूर तालुक्यातील 26 गावांमधील 55 शेतकऱ्यांची 16.80 हेक्टर, उरण तालुक्यातील 27 गावांमधील 1239 शेतकऱ्यांची 380.65 हेक्टर, मुरूड तालुक्यातील 39 गावांमधील 654 शेतकऱ्यांची 51.00 हेक्टर, माणगाव तालुक्यातील 3 गावांमधील 23 शेतकऱ्यांची 7.72, रोहा तालुक्यातील 4 गावांमधील 7 शेतकऱ्यांची 2.20 हेक्टर, महाड तालुक्यातील 8 गावांमधील 33 शेतकऱ्यांची 6.15 हेक्टर, पोलादपूर तालुक्यातील 1 गावामधील 5 शेतकऱ्यांची 0.46 हेक्टर, म्हसळा तालुक्यातील 17 गावांमधील 40 शेतकऱ्यांची 7.00 हेक्टर, श्रीवर्धन तालुक्यातील 3 गावांमधील 6 शेतकऱ्यांची 1.35 हेक्टर जमीन अशी एकूण जिल्ह्यातील 182 गावांमधील 2946 शेतकऱ्यांची 746.32 हेक्टर जमिनीवरील भातपीक कुजले आहे. पनवेल, सुधागड-पाली, तळा तालुक्यातील नजर पाहणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

Exit mobile version