औतावरच्या गाण्यांनी शिवार गजबजले
I पाताळगंगा I वार्ताहर I
सध्या शेतकरी लावणीच्या कामांमध्ये गुंतल्याचे चित्र जिल्हाभर पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात अग्रेसर असलेले लाकडी नांगर घेऊन शेतकरी शेतात काम करीत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. खांद्यावर चाबूक, खिल्लारी सर्जा-राजांची डौलदार बैलजोडी अन् औतावरील मधुर गीतांच्या आरोळीने रानोमाळ गजबजू लागल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
जिल्ह्याच्या सर्व ग्रामीण भागात सध्या भाताची लावणी जोरदार सुरु असून, शेतकरी कामात मग्न असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व रानोमाळ बळीराजाच्या औताच्या गीतांच्या मैफिलीने रंगून जात आहे. रानपाखरांच्या गाणार्या स्वर अन् बळीराजाची शाहीर गीते, सर्जा-राजाच्या गळ्यातील घुंगारांचा आवाज या मंजुळ स्वरांनी रानोमाळ संगीतमय झाला असून, शेतीच्या कामांनी जोर धरला आहे. औतावरील गीतांच्या मधुर मैफलीमध्ये सर्जा-राज्याच्या नावानं गीत गाणे, ओव्या गाणे, बैलांना हाक देणे असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे, यामुळे शेतीच्या कामाला वेग आलाय, हे निश्चित.