। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
आदिवासी विभागाच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा कर्जतमधील पिंगळस येथील शासकीय आश्रमशाळेत संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन पेणचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पडसरेनी आश्रमशाळेने उत्तम कामगिरी करत अनेक बक्षिसांची कमाई केली आहे.
या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत पडसरे आश्रमशाळेने कबड्डी मुली, रिले 4 बाय 100, गोळाफेक यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, लांब उडी, 200 मीटर धावणे, 5 हजार मीटर चालणे यात द्वितीय क्रमांक आणि उंच उडीत तृतीय क्रमांक पटकावून घवघवित यश मिळविले आहे. प्रशिक्षक अनिल साजेकर तसेच शिक्षक राजू मोरे, दिपाली घरट, जाणू दोरे, मंगेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कुलाबा जिल्हा आदिवासी सेवा मंडळ पाली अध्यक्ष रवींद्र लिमये तसेच माध्यमिक मुख्याध्यापक संदीप शिंदे प्राथमिक मुख्याध्यापिका मीनाक्षी ढोपे यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.