माथेरान नेरळ घाटरस्त्यातील दरड धोकादायक

गटारे दगडांनी भरल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ- माथेरान घाट मागील काही वर्षात दोन गाड्या आरामात प्रवास करू शकतात असा बनला आहे. हा घाटरस्ता बनविताना रस्त्याच्या एका बाजूने आरसीसी गटारे बांधण्यात आली आहेत. मात्र ती गटारे दगडांनी भरली असून पावसाचे पाणी थेट रस्त्याने वाहत आहे. दरम्यान, माथेरान घाटरस्त्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून अनेक दरड धोकादायक अवस्थेत उभे असून त्या दगडांना बाजूला करून घाटरस्ता अपघातमुक्त करावा अशी मागणी नेरळ- माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेने केली आहे.

घाटरस्ता सर्वात आधी रुंद करण्याचे काम 1999 मध्ये कोकण पॅकेज च्या माध्यमातून सुरु झाले.त्यानंतर मागील तीन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्याचे रुंदीकरण,रस्त्याच्या बाजूला संरक्षण भिंती तसेच गटारे बांधण्यात आली.त्यावेळी अनेक ठिकाणी रस्ता रुंद करण्यासाठी डोंगरातील दगड फोडले गेले आणि त्यात डोंगरातील अनेक दगड खिळखिळे झाले आणि त्यामुळे तेंव्हापासून पावसाळ्यात घाटात सतत दरडी कोसळत असतात. हि समस्या नित्याची बनली असून त्यावेळी कोसळलेले दगड आणि अर्धवट डोंगरात राहिलेले दगड यामुळे वाहनचालक यांच्या मनात घाटरस्त्याने प्रवास करताना सतत धाकधूक असते.

त्यात पहिल्या वर्षी रस्त्याच्या दुतर्फ़ असलेल्या गटारांमधील दगड पावसाळा सुरु होण्याच्या आधी काढण्यात आली,पण मागील दोन वर्षे घाटातील रस्त्याच्या बाजूला असलेली गटारे दगडांनी भरून गेली आहेत. त्याचा परिणाम घाटरस्त्यात पावसाळयात पाणी वाहून जात नाहीत आणि ते पाणी सरळ रस्त्यावरून वाहते आणि त्याचा परिणाम रस्त्याचे डांबरीकरण खराब होण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे सर्व गटारे तात्काळ दगड मुक्त करावीत आणि त्यांचा वापर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्हावा अशी मागणी नरेंद्र कराळे, तौसिफ़ सरावले,रवींद्र मिसाळ,संतोष पार्टे, सलीम नजे,संतोष लिये, मिलिंद सुर्वे ,यशवन्त मोरे,तसेच नावेद नजे,सचिन लोभी यांच्या सह्यांचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. काही ठिकाणी दरडी सुटावलेल्या अवस्थेत असून त्या कोणत्याही क्षणी पडून अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे हा एकमेव घाट रस्ता नैसर्गिक आपत्तीमुळे रहदारीसाठी बंद झाल्यास त्याचे पर्यटनावर विपरीत परिणाम होतील. वयस्कर, जेष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर स्त्रिया तसेच हृदयविकाराचे व इतर रुग्णांना रुग्णालयात जाण्यास संभाव्य विलंब झाल्यास ते जीवघेणे ठरू शकते.

Exit mobile version