चित्रकार पराग बोरसे यांना ‌‘यांग फॅमिली’ पुरस्कार

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार पराग बोरसे यांनी पुन्हा एकदा भारताचा गौरव वाढवला आहे. अमेरिकेतील पॅस्टेल सोसायटी ऑफ अमेरिका आयोजित 53 व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये त्यांच्या Enduring Brilliance मध्ये त्यांच्या Folk Legacy या चित्राला प्रतिष्ठित यांग फॅमिली पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारासोबत 1, 000 डॉलर रोख रक्कम देण्यात येणार आहे.

पुरस्कारप्राप्त चित्र Folk Legacy हे महाराष्ट्रातील एका मेंढपाळाचे प्रभावी व्यक्तिचित्रण आहे. केशरी पागोटे, चेहऱ्यावरचे सुरकुत्या, थोडासे पांढरट दाढीचे केस आणि भावपूर्ण नजर या सर्व तपशीलातून त्याच्या आयुष्याचा अनुभव व परंपरेचे सौंदर्य अधोरेखित केले आहे. हे चित्र सॉफ्ट पॅस्टेल्स ऑन सॅन्डेड पेपर या माध्यमात साकारले आहे. पॅस्टेल सोसायटी ऑफ अमेरिका ही पॅस्टेल कला क्षेत्रातील सर्वांत जुनी व प्रतिष्ठित संस्था आहे. यावर्षीचे पुरस्कार परीक्षक म्हणून केरी मॅक वेबर, कार्यकारी संचालक फेअरफिल्ड युनिव्हर्सिटी आर्ट म्युझियम, कनेक्टिकट, अमेरिका यांनी निवड केली. हा पुरस्कार पराग बोरसे यांना 19 सप्टेंबर 2025 रोजी नॅशनल आर्ट्स क्लब, मॅनहॅटन, न्यूयॉर्क, अमेरिका येथे प्रदान केला जाणार आहे. ही बोरसे यांची सलग दुसरी कामगिरी आहे गेल्या वर्षी त्यांनी याच प्रदर्शनात फ्लोरा बी. गफिन पुरस्कार जिंकला होता.

बोरसे यांना अमेरिकेतील पॅस्टेल सोसायटी ऑफ द वेस्ट कोस्ट कडून दोन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. 2018 मध्ये त्यांना संस्थेचा सर्वोच्च साऊथवेस्ट आर्ट मॅगझिन पुरस्कार मिळाला आणि याशिवाय पोर्ट्रेटसाठी ब्रॉन्झ पुरस्कार देखील मिळवला. त्यांची कलाकृती आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वेळा गौरवली गेली असून, अमेरिकेतील प्रतिष्ठित The Pastel Journal मासिकाने त्यांना जगातील पाच सर्वोत्तम पॅस्टेल कलाकारांपैकी एक म्हणून घोषित केले व त्यांच्या चित्रांवर तीन पानी लेख प्रसिद्ध केला.

कलाकाराबद्दल
पराग बोरसे हे मुंबईतील सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे पदवीधर असून, ग्रामीण भारताचे जीवनदर्शन घडवणाऱ्या त्यांच्या अप्रतिम पोर्ट्रेट्ससाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी भारतात तसेच परदेशात अनेक प्रतिष्ठित प्रदर्शनात भाग घेतला असून, अमेरिका, सिंगापूर व दुबईसह अनेक देशांत कार्यशाळा व व्याख्याने घेतली आहेत.


“माझ्या कलाकृतीतून भारतातील ग्रामीण जीवनाचे चेहरे आणि कथा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत आलो आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

पराग बोरसे,
चित्रकार

Exit mobile version