| लाहोर | वृत्तसंस्था |
न्यूझीलंड संघाने नुकताच पाकिस्तान दौरा केला. या दौऱ्यात दोन्ही संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना शनिवारी (दि.27) पाकिस्तानने 9 धावांनी जिंकला. पाकिस्तानच्या या विजयामुळे 5 सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्ताने विजय मिळवलेला. परंतु, तिसरा आणि चौथा सामना न्यूझीलंडने जिंकत मालिकेत आघाडी मिळवली होती. त्यामुळे न्यूझीलंडला पाचवा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याची संधी होती. मात्र, पाकिस्तानने पाचवा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवली आणि मायदेशात मालिका पराभवाची मानहानी टाळली. या विजयासह पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर एक विश्वविक्रमही झाला आहे.
बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानने 44 वा टी-20 विजय मिळवला आहे. त्याचमुळे बाबरने आता आंतरराष्ट्रीय टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या कर्णधारांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. तो युगांडाच्या ब्रायन बसाबासह या यादीत संयुक्तपणे अव्वल क्रमांकावर आहे.