पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मोहम्मद खुरासानी अफगाणिस्तानात ठार

। काबूल । वृत्तसंस्था ।
पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी खालिद बटली उर्फ मोहम्मद खुरासानी याचा अफगाणिस्तानात खात्मा करण्यात आलाय. नंगरहार प्रांतात मोहम्मद खुरासानीचा शेवट झाल्याचं पाकिस्तानच्या वरिष्ठ सैन्य अधिकार्‍यांनी म्हटलंय. मात्र, खुरासानीचा मृत्यू कसा झाला याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मोहम्मद खुरासानी पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना तहरिक ए तालिबान पाकिस्तानचा एक वरिष्ठ म्होरक्या होता. पाकिस्तानी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय मोहम्मद खुरासानी हा टीटीपीचा प्रवक्ताही होता. पाकिस्तानी नागरिक आणि सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक हल्ल्यांमध्ये खुरासानी सक्रीयरित्या सहभागी होता. अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता काबीज केल्यानंतर त्याचे अनेक काबूल दौरे झाल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला आहे.

टीटीपी प्रमुख मुफ्ती नूर वली मेहसूद याच्यासोबत संघटनेच्या वेगवेगळ्या गटांना एकत्र करत करून दहशतवादी कृत्यांसाठी सक्रीय करण्याचा काम खुरासानीकडून सुरू असल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. पाकिस्तानात अनेक दहशतवादी हल्ल्यांची योजनाही त्यानं आखली होती. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानात दहशतवादी हल्ले करण्याची धमकीही त्यानं दिली होती.

गिलगिट-बाल्टिस्तानचा रहिवासी असलेला मोहम्मद खुरासानी हा गेल्या अनेक वर्षांपासून टीटीपीचा ऑपरेशनल कमांडर होता. 2007 मध्ये तो स्वात खोर्‍यातील बंदी घालण्यात आलेल्या ’तहरिक निफाज शरियत-ए-मुहम्मदी’ या दहशतवादी संघनटनेत सामील झाला. टीटीपीचा माजी गटनेता मुल्ला फजलुल्लाह याच्याशी त्यानं घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले होते.

Exit mobile version