| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दुबईत सध्या आयसीसीची बोर्ड मिटिंग सुरू आहे. दरम्यान, 2025 मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाबाबत पाकिस्तानला अजून एक मोठा धक्का बसू शकतो. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला जाण्याची शक्यता जवळपास नाहीये. त्यामुळे पुन्हा पाकिस्तानला हायब्रिड मॉडेल वापरावे लागण्याची शक्यता आहे. आयसीसीमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, सरकार त्याविरोधात असेल तर भारताचा स्पर्धेतील सहभाग हा आयसीसी ठरवू शकत नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी ही 2025 च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे.
हा आताच्या आयसीसी बैठकीचा मुद्दा नाही मात्र पीसीबी चेअरमन मोहसीन नक्वी यांनी या विषयावर बीसीसीआय सचिव जय शहा आणि आयसीसीसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आश्वासन हवं आहे. मात्र आयसीसी बोर्ड सदस्याने सांगितले की, बीसीसीआय या बाबतचा निर्णय हा स्पर्धा जवळ आल्यावरच घेईल. सध्याच्या घडीला तरी युएईचा पर्याय हा पूर्णपणे बाद ठरवता येणार नाहीये.
आयसीसीच्या बोर्ड सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, मबोर्ड मिटिंगमध्ये प्रत्येक सदस्य हा आपली समस्या बोलून दाखवू शकतो. त्यानंतर त्यावर मतदान होईल. मात्र सदस्य देशातील सरकारच तिथे खेळण्यास नकार देत असेल तर आयसीसीला दुसरा पर्याय शोधावा लागेल. सदस्य देशाने त्याच्या सरकारविरूद्ध जावे अशी आयसीसी अपेक्षा करू शकत नाही.
पाकिस्तानात नुकतेच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांनी मालिका खेळल्या आहेत. त्यामुळे बीसीसीआयवर किमान आयसीसी स्पर्धांमध्ये तरी पाकिस्तानात खेळावे यासाठी दबाव आहे. मात्र बीसीसीआयचे आयसीसीमधील वजन जास्त असल्याने भारताला डावलून चालणार नाहीये.