महत्वाच्या सामन्यात बाबर-रिझवानची शतकी सलामी
| सिडनी । वृत्तसंस्था ।
टी-20 वर्ल्डकप 2022 च्या पहिल्या सेमी फायनल सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 विकेट्स राखून पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे गेल्या 7 वर्षात न्यूझीलंडने तीनवेळा आयसीसी वर्ल्डकपची फायनल गाठली आहे. मात्र त्यांना एकदाही ही ट्रॉफी उंचवता आलेली नाही. यंदाही त्यांनी दमदार खेळ करून देखील सेमी फायनलमध्ये कच खाल्ला. 2015 आणि 2019 ला न्यूझीलंड वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहचली होती. मात्र त्यांना अंतिम सामना जिंकता आला नव्हता. तर 2021 मध्ये त्यांनी टी-20 वर्ल्डकप अंतिम फेरीत धडक मारली होती.
न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी 153 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पाकिस्तानने 3 विकेट्स गमावून शेवटच्या षटकात पार केले. कर्णधार बाबर आझमने 53 धावांची तर मोहम्मद रिझवानने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. मोहम्मद हारिसने 30 धावा करत त्यांना चांगली साथ दिली.
न्यूझीलंडचे विजयासाठीचे 153 धावांचे आव्हान घेऊन मैदनात उतरलेल्या पाकिस्तानने 5 षटकात नाबाद 47 धावांपर्यंत मजल मारली. मोहम्मद रिझवानने पहिल्याच षटकात मिळालेल्या जीवनदानाचा चांगला फायदा उचलत आक्रमक फलंदाजी केली. पॉवर प्लेमध्ये चांगली सुरूवात केल्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने आपली भागीदारी अजून वाढवण्यास सुरूवात केली. या दोघांनी 11 षटकात पाकिस्तानला 97 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, बाबारने आपला गिअर बदलला होता. त्याने 38 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर बाबर आणि रिझवानने आपली भागीदारी शतकापर्यंत नेत सामन्यावरील पकड मजबूत केली.
मात्र बोल्टने बाबरला 53 धावांवर बाद करत ही जोडी 105 धावा झाल्यानंतर फोडली. सामना 45 चेंडूत 48 धावा असा असल्याने न्यूझीलंडला या विकेटनंतर आशेचे किरण दिसू लागले. दरम्यान, रिझवानने अर्धशतक पूर्ण करत डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र सामना बॉल टू रन आला असताना तो 57 धावांवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद हारिसने आक्रमक 30 धावा करत संघाला विजयाच्या जवळ पोहचवले. शेवटी शान मसूदने शेवटच्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना खराब सुरूवातीनंतर डाव सावरत 20 षटकात 4 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने झुंजार अर्धशतक ठोकले. तर कर्णधार केन विलियम्सनने 46 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या.