। मुंबई । वृत्तसंस्था ।
पाकिस्तानच्या कर्णधार बाबर आझमने टी 20 मध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात वेगाने 7 हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आझमने 187 डावात 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या विक्रमासह ख्रिस गेल आणि विराट कोहली यांना मागे टाकले आहे. पाकिस्तान टी 20 लीगमध्ये त्याने 49 चेंडूत 59 धावा केल्या. या डावात त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. आझमने 25 धावा करताच 7 हजार धावा केल्या. ख्रिस गेलने 192 डावात आणि विराट कोहलीने 212 डावात 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. बाबर आझमने टी 20 सामन्यातील 196 सामन्यात 187 डावात 6 शतक आणि 59 अर्धशतक केलं आहे. एका डावात 122 धावा ही आझमची सर्वोत्तम खेळी आहे. त्याचबरोबर 61 आंतरराष्ट्रीय डावात 56 डावात 47 च्या सरासरीने त्याने 2,204 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक आणि 20 अर्धशतकं आपल्या नावावर केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा फलंदाज आहे. दुसरीकडे विराट कोहलीने टी 20 प्रकारात अजूनही शतक केलेलं नाही. टी 20 मध्ये 30 खेळाडूंनी 7 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्यातील 5 खेळाडूंनी 10 हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल 14,276 धावांसह टॉपवर आहे, गेलसह पोलार्ड, पाकिस्तानचा शोएब मलिक, ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर आणि विराट कोहलीचा यात समावेश आहे. तर पाकिस्तानच्या 3 खेळाडूंनी 7 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. बाबर, मलिक यांच्यासह मोहम्मद हफीजचा यात समावेश आहे. तर भारताचे चार खेळाडू या यादीत आहेत. कोहलीसह रोहित शर्मा, सुरेश रैना आणि शिखर धवनचा यात समावेश आहे.







