। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बांगलादेशकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचे जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. भारतीय संघ आघाडीवर असून दुसर्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. त्यामुळे अंतिम सामन्याच्या शर्यतीत हेच दोन संघ सध्या आघाडीवर आहेत. तसेच, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम सामन्याची तारीख आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने मंगळवारी (दि.3) जाहीर केली आहे. 11 ते 15 जून 2025 या कालावधीत लॉर्ड्स मैदानावर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या कसोटीसाठी 16 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
जागतीक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना लॉर्ड्सवर खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. 2021 आणि 2023 मधील स्पर्धेचा अंतिम सामना ओव्हलवर खेळवण्यात आला होता. आणि भारतीय संघाला हार पत्करावी लागली होती. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने तेव्हा स्पर्धा जिंकली होती. सध्याच्या रोहित शर्माचा भारत अव्वल स्थानावर आहे आणि पाठोपाठ गतविजेता ऑस्ट्रेलियन संघ आहे. त्यामागोमाग न्यूझीलंड (तिसरा), इंग्लंड (चौथा), श्रीलंका (पाचवा), दक्षिण आफ्रिका (सहावा) आणि बांगलादेश (सातवा) आहे.