फिन अ‍ॅलनकडून पाकिस्तानची धुळदाण

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएल 2024 चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी लिलावात सर्व विक्रम मोडीत काढले. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या तिसर्‍या टी-20 मध्ये किवी संघाचा स्टार आणि स्फोटक फलंदाज फिन अ‍ॅलनने खेळलेली इनिंग पाहिल्यास त्याने अशी खेळी आधी खेळली असती, तर कदाचित त्यालाही मोठी बोली लागली असती.

सध्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामन्यांची 20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (दि.17) खेळला गेला. या सामन्यात सलामीवीर फिन अ‍ॅलनने कमाल केली. त्याने केवळ 62 चेंडूंचा सामना केला आणि 220 च्या अविश्‍वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 137 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता.

24 वर्षीय फिन अ‍ॅलन हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. इतकेच नाही तर रॉयल चॅलेंजर्सने 2024 च्या लिलावापूर्वी त्याला रिलीज केले होते. आता फिनचे हे रूप पाहून बंगळुरूला कुठेतरी थोडा पश्‍चाताप झाला असेल. तसेच, अ‍ॅलन आयपीएल 2024 च्या लिलावाचा भाग होता. त्याची मूळ किंमत फक्त 75 लाख रुपये होती. तथापि, कोणत्याही फ्रेंचायझीने त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवले नाही. ही खेळी पाहून सर्व आयपीएल फ्रँचायझींना पश्‍चाताप होत असेल.

Exit mobile version