| मुंबई । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर-12 फेरीतील गट-2 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. या पराभवानंतर भारताची गट-2 मध्ये दुसर्या स्थानावर घसरण झाली, तर दक्षिण आफ्रिका 5 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवामुळे भारताच्या पुढील वाटचालीत फारसे नुकसान झाले नसले तरी पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. पाकिस्तानचे स्पर्धेतून बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले आहे.
भारताच्या या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते संतापले आहेत. पर्थमधील स्टेडियमबाहेरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विराट कोहलीने सोडलेल्या एडन मार्करामच्या झेलवरही प्रश्न उपस्थित केला आहे. भारताच्या पराभवाने हताश झालेल्या पाकिस्तानने याला फिक्स्ड मॅच म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या विजयासाठी संपूर्ण पाकिस्तान प्रार्थना करत होता, पण भारताला या स्पर्धेत पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. कोहलीने संपूर्ण समाजाला फसवले असे पाकिस्तानी चाहते म्हणतात. भारताचा माजी कर्णधार कोहलीने जसा झेल सोडला तसा गल्लीतील मुले सोडत नाहीत.