। महाड । प्रतिनिधी ।
पावसाळ्यामध्ये महाड तालुक्याला नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाकडून धोकादायक व दरडग्रस्त गावांवर लक्ष ठेवण्यासाठी व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक गावांकरिता पालक म्हणून अधिकार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रशासन व ग्रामस्थ यामध्ये समन्वय राहणार आहे.
महाड तालुक्यात दोन दिवस जोरदार झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या आणि हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर दरडग्रस्त गावातील पालक अधिकार्यांसोबत महाडचे प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे यांनी, मंगळवारी (दि.9) तातडीच्या बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला तहसीलदार महेश शितोळे यांच्यासह शासनाच्या महसूल, कृषी यांसह अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक इत्यादी उपस्थित होते.
भू-वैज्ञानिकांकडून महाड तालुक्यातील 72 गावे दरडग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. या गावात आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने करावयाच्या उपाययोजना विषयी मार्गदर्शन करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. प्रशासनाकडून प्रत्येक गावांसाठी एक पालक अधिकारी नेमण्यात आला आहे. या पालक अधिकार्याकडे गावाची संपूर्ण जबाबदारी राहणार आहे.सध्या महाड तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली असून रायगड जिल्ह्यात देखील हवामान खात्याकडून मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. दरडग्रस्त गावात जनजागृतीपर माहितीपत्रक व सूचना फलक लावणे, हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी झाल्यानंतर नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करणे, आपत्ती काळात एकमेकांशी सुसंवाद व संपर्क ठेवणे, एनडीआरएफ आपत्ती बचाव पथकाचे आवश्यक त्या ठिकाणी नियोजन करणे इत्यादी बाबतीत प्रांताधिकारी डॉक्टर बाणापुरे व महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.