पळस ग्रामपंचायत महिलांना करणार सक्षम

। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील ग्रुप ग्रामपंचायत पळस आयोजित व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 15 वा वित्त आयोग अंतर्गत वसुंधरा सामाजिक कौशल्य संस्था कोल्हापूर यांच्या विद्यमाने महिला कौशल्य विकास प्रशिक्षण शिबीर व मेळाव्याचे आयोजन शेतपळस येथील श्री अकादेवी मंदिर सभागृहात सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी करण्यात आले असून या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीच्या पेण विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष शिवराम शिंदे यांच्या हस्ते श्री अकादेवी मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आले.

ग्रामीण भागातील महिला शेती व घर सांभाळण्याचे काम करतात. त्यातील काही ठराविक महिला बाहेर कामासाठी जातात. या सर्व महिलांना आपल्या गावातच काम करून चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होण्यासाठी या प्रशिक्षण शिबिराचे ग्रामपंचायत पळस यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले असून या शिबिरासाठी शासनाकडून 50 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी पळस सरपंच परीक्षा विक्रांत घासे, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, माजी सरपंच हिराजी शिंदे, मारुती शिर्के, सदस्य किसन बोरकर, सतिश डाकी, निष्ठा विचारे, सुप्रिया डाकी, सुरेखा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये महिलांना मसाले प्रॉडक्ट तयार करणे व मेणबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून हळदीकुंकू कार्यक्रमाने शिबिराची सांगता होणार आहे.

Exit mobile version