| पनवेल | वार्ताहर |
पळस्पे ते जेएनपीटी हा महामार्ग दुचाकीस्वार आणि हलक्या वाहनांसाठी धोकादायक महामार्ग बनला आहे. यंदाच्या वर्षी 1 जानेवारी ते जून महिन्यापर्यंत या महामार्गावर पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद आहे. पनवेल शहर वाहतूक शाखेच्या विविध प्रयत्नांमुळे विविध महामार्गावर मागील वर्षीपेक्षा अपघाताचे प्रमाण दुपटीने कमी झाले आहे. परंतु या महामार्गातील दोष वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र दिल्यानंतर सुद्धा कमी झालेले नाहीत.
या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनांची महामार्गावरील गती मंदावली आहे. काँक्रीटच्या महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम संथगतीने सुरू आहे. मागील वर्षी पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या विविध महामार्गावर 21 जणांचा अपघाती मृत्यू झाला. यावर्षी 11 मृत्यूंची नोंद झाली. ज्या प्राधिकरणाच्या अखत्यारीत तो रस्ता आहे त्यांनी तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. मात्र पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्या सूचनेनंतर पळस्पे ते जेएनपीटी महामार्गावरील मॅरेथॉन इमारतीसमोरील महामार्गाला जोडणाऱ्या कटविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तातडीने पावले उचलण्यास तयार नाही. मागील आठवड्यात रात्री येथे दुचाकीस्वाराचा दुभाजक न दिसल्याने अपघाती मृत्यू झाला. पनवेल पोलिस शहर वाहतूक विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक महिन्यांपासून हा दुभाजक काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लेखी पत्र अनेकदा दिले आहे. दुभाजक काढून टाकण्यासाठी वेळ लागत असल्यास त्या जागेवर रात्रीच्यावेळी दुभाजक दिसण्यासाठी हायमास्टचे पथदिवे उभारण्याची सूचना केली होती. मात्र हा प्रस्ताव अनेक महिने लालफितीत अडकला आहे. तर दोन दिवसापूर्वी मॅरेथॉन बिल्डिंग समोर पळस्पे ते मुंबई जाणाऱ्या रोड वर चार वाहनांचे टायर फुटल्याची घटना सुद्धा घडली आहे.
पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सोलार ब्लिकर्स लावण्यासाठी संबंधित एजन्सीला ऑर्डर दिली आहे. महामार्गातील खड्डे भरण्यासाठी पेव्हर ब्लॉक लावण्यासाठी दोन वेगळी मजुरांची पथकांकडून काम सुरू आहे. महामार्ग दोषमुक्त करण्यासाठी आमचे काम सुरूच असते.
यशवंत घोटकर,
प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण