शेकापने सार्वजनिक बांधकाम अधिकार्यांचे वेधले लक्ष
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नागाव-पाल्हे पुलाचा एक भाग खचला असून दगड निघाले आहेत. त्यामुळे हा पुल वाहतूकीस धोकादायक असल्याची भिती निर्माण झाली आहे. या नादुरुस्त पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्याचे काम नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी केले आहे. त्यांनी कार्यकारी अभियंता यांना सोमवारी (दि.24) निवेदन दिले आहे. त्यानंतर उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनीदेखील जीणर्र् पुलाची दुरुस्ती करण्याचे मागणी पत्र बुधवारी (दि.26) दिले आहे. यावेळी तालुका प्रमुख शंकर गुरव, उपजिल्हा संघटक अजित पाटील, जिल्हा प्रवक्ता विकास पिंपळे उपास्थित होते. तालुक्यातील नागाव-पाल्हे हा जूना पुल आहे. या पुलावरून रेवदंडा, नागाव, काशीद, मुरूड, अलिबागकडे जाणार्या प्रवाशांची संख्या प्रचंड आहे. त्यात पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ या मार्गावर अधिक आहे. हा पुल जीर्ण झाल्याबाबत अनेकवेळा शेतकरी कामगार पक्षाने आवाज उठविला.त्यामुळे या पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली.
नागाव-पाल्हे या पुलाचा काही भाग ढासळला आहे. पुलाच्या बंधार्याला भलेमोठे भगदाड पडले आहे. या भगदाडामुळे पूल पुर्णतः नादुरुस्त अवस्थेत आहे. या नादुरुस्त पुलामुळे मोठी हानी होण्याची भिती आहे. याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी सोमवारी कार्यकारी अभियंता सुखदेवे यांची भेट घेतली. या जीर्ण पुलाबाबतची माहिती देऊन हा पुल कोसळल्यास अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भिती आहे. या मार्गावरून येणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. हा पुल तातडीने दुरुस्त करा, अशी मागणी त्यांनी यावेळी निवेदन देऊन केली. यानंतर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनीदेखील संबंधित अधिकार्यांची भेट घेऊन पुल तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी बुधवारी निवेदनाद्वारे केली आहे.
नागाव हे पर्यटनदृष्टया महत्वाचे ठिकाण आहे. वर्षाला लाखो पर्यटक नागावमध्ये येतात. नागावसह रेवदंडाकडे ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून नागाव-पाल्हे पुलाकडे पाहिले जाते. हा पुल खूप जूना असून अरुंद आहे. हजारो वाहने या पुलावरून जातात. जीर्ण झालेल्या पुलाच्या जागी नवीन पुल बांधण्यात यावा. पूल बांधणे काळाची गरज आहे. पुलाला भगदाड पडलेली बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्याची दखल घेत त्यांच्याकडून बुधवारी सकाळी कामाला सुरुवातदेखील करण्यात आली आहे.
हर्षदा मयेकर
सरपंच,
नागाव