वन्यजीवांसाठी नंदनवन

भिरा पाटणूस परिसरात चौशिंग्याचे दर्शन

पाली/बेणसे | वार्ताहर |

अत्यंत दुर्मिळ असलेली चौशिंगा नावाची हरणाची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात सुद्धा काही ठिकाणी ते आढळते. माणगाव तालुक्यातील भिरा पाटणूस परिसरात या दुर्मिळ चौशिंग्याचे दर्शन झाले आहे. येथील निसर्ग व वन्यजीव अभ्यासक राम मुंडे यांनी  या भागात पक्षी निरीक्षण करण्यासाठी गेले असता, एका उंच ठिकाणावरून पक्षांचे फोटो काढत असतांना सकाळच्या वेळी एका झाडाखाली तो झाडाची पान खातांना हा चौशिंगा दिसला. यामुळे मुबलक निसर्ग संपन्नतेने वेढलेला हा परिसर वन्यजीवांसाठी नंदनवन ठरत आहे.
सद्य परिस्थितीत कोकणातून हि प्रजाती जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे याचा कमी होत चाललेला अधिवास आणि वाढती शिकार. या बरोबरच उन्हाळा सुरु झाला कि हा प्राणी तहान लागल्याने पाणी पिण्यासाठी जंगलातील पाणवट्यावर पाणी पिण्यासाठी येतो त्यावेळी लक्ष ठेऊन याची शिकार देखील केली जाते. अशा दुर्मिळ प्राण्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे.

वनव्यांमुळे अधिवास नष्ट
फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान जंगलातील झाडांची पानगळती झाल्याने आणि सध्यस्थितीत जंगलाला लावल्या जाणाऱ्या वणव्यामुळे यांचा अधिवास नष्ट होत चालला आहे. वणवे लावल्यामुळे यांचा अस्तित्वाचा प्रश्न तर निर्माण होतोच, त्याच बरोबर यांची उपासमार मोठ्या प्रमाणावर होत आहे. जंगलातील गवत, विविध झाडांची पाने, झाडांची फळे, फुले यांवर आपली गुजरान करणाऱ्या या प्राण्याची वणव्यामुळे उपासमार होते. तसेच वणव्यामुळे याला लपण्यासाठी झुडपांच्या जाळ्या किंवा सुरक्षित जागा मिळत नाहीत.

हि प्रजाती जवळपास भेकर सारखी दिसून येते, अत्यंत चपळ असणाऱ्या या चौशिंग्याच्या कपाळावर दोन सरळ उभी शिंगे दिसून येतात तर दोन डोळ्यांच्या वरच्या भागावर आणखी दोन छोटी शिंगे असल्याने याला चौशिंगा नावाने ओळखले जाते.
– राम मुंडे
निसर्ग व वन्यजीव अभ्यासक

Exit mobile version