। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने बांधलेले पाली-भूतीवली लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरून गेला आहे.धरणाचे कालवे पूर्ण नसल्याने धरणाचे पाणी शेतीसाठी सोडले जात नाही. गेली काही दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे पट्ट्यातील हे धरण ओसांडून वाहू लागले असून, दरवर्षी हे धरण जुलै महिन्यात पूर्ण भरून वाहू लागते. दरम्यान, वर्षासहलीसाठी प्रसिद्ध असलेल्या या धरणावर मात्र पर्यटकांना 100 टक्के बंदी आहे.
नेरळ-कर्जत रस्त्याच्या भिवपुरी रोड गावाच्या समोर पाली भूतीवली धरण असून, 2003 मध्ये या धरणाचा मुख्य बांध घातला गेल्यानंतर पावसाळ्यात जलाशयात पाण्याचा साठा झाला होता. त्यावेळी आणि आजपर्यंत धरणाचे पाणी परिसरात असलेल्या 1100 हेक्टर शेतीला सोडण्यासाठी कालवे बांधण्याचे पाटबंधारे विभागाकडून खोदण्यात आले नाहीत. त्यामुळे धरणाचे पाणी आजतागायत शेतीसाठी देण्यात आले नाही. परिणामी, ते पाणी आजही तसेच पडून असते. धरणातील साठून असलेल्या पाणी मोठ्या प्रमाणात तसेच राहात असल्याने 35 दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते.
त्यामुळे या वर्षी पावसाने उशिरा जरी सुरुवात केली असली तरी अवघ्या दहा दिवसांत धरणाच्या जलाशयाने आपली पातळी गाठली असून, ते ओव्हरफ्लो झाले आहे. परंतु, सांडव्याखाली असलेल्या पायर्यांवर बसून अनुभवण्यासाठी पर्यटकांना बंदी आहे. कारण ते काम अपूर्ण असल्याने त्या ठिकाणी पर्यटक आणि वर्षासहलप्रेमींनी बंदी आहे. कारण, धरणाच्या जलाशयात आजपर्यंत किमान बाहेरून फिरण्यासाठी आलेल्या किमान 15 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे धरणाच्या परिसरात पर्यटनासाठी येणार्यांना बंदी घातली आहे. पाटबंधारे विभागाने आणि नेरळ पोलीस दलाने या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
पाली-भूतीवली धरणात यापूर्वी अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ते लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारच्या धबधब्यावर जाण्यास बंदी घातली होती. आम्ही पोलीस दल पर्यटकांच्या जीविताला असलेला धोका लक्षात घेऊन धरणाच्या परिसरात जाण्यास बंदी घातली आहे.
राजेंद्र तेंडुलकर, पोलीस निरीक्षक, नेरळ