। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि त्या भागातील जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेले पाली भुतीवली येथील लघु पाटबंधारे प्रकल्प गुरुवारी (दि.25) ओव्हरफ्लो झाले. गतवर्षी 31 जुलै रोजी हे धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले होते.
माथेरान डोंगरातून येणारे पाणी अडवून ते उन्हाळी भातशेतीसाठी देण्याकरीता पाली भुतीवली या दोन गावांचे विस्थापन करून लघुपाटबंधारे प्रकल्प बांधण्यात आला होता.100 एमएलडी क्षमता असलेले हे धरण गतवर्षी 31 जुलै रोजी भरले होते. यावर्षी पाच दहा दिवस आधीच धरण ओव्हरफ्लो झाले असून शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.सकाळच्या वेळी धरणाचे पाणी पाहण्यासाठी गेलेले स्थानिक रहिवासी सचिन गायकवाड आणि वैभव भगत यांच्यासमोर धरणाचे पाणी ओव्हरफ्लो झाले. त्यावेळी धरणातील पाण्याबरोबर असंख्य मासे उड्या मारून खाली आदळत होते. त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी मासे पकडण्यासाठी आणि धरणातून खाली कोसळणारे मासे पाहण्यासाठी गर्दी केली होती.
पाली भुतीवली धरण ओव्हरफ्लो
