पाली बसस्थानक गैरसोयींचे आगार

खड्डे, पाणी, चिखल, दुर्गंधी, नवीन इमारतीचे काम ठप्प
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ व सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बसस्थानकाचे नूतनीकरण मागील दोन वर्षांपासून ठप्प आहे. तसेच स्थानकाला खड्डे, पाणी, चिखल, दुर्गंधी आदी विविध समस्यांनी वेढले आहे. परिणामी, येथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. बसस्थानकाला अच्छे दिन कधी येणार? असा सवाल जनतेतून विचारला जातोय.

सव्वा वर्षांपूर्वी पाली ब स्थानकाची जुनी धोकादायक इमारत तोडण्यात आली आहे. त्यावेळी स्थानक आवारात तात्पुरत्या स्वरूपाची निवारा शेड बांधण्यात आली. मात्र त्यानंतर एक वर्षे उलटून गेली तरी आजतागायत परिवहन महामंडळ अथवा कंत्राटदाराकडून तेथे कोणत्याही स्वरूपाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. जुन्या इमारतीचे डेब्रिज व राडारोडा स्थानकात तसाच पडला आहे. स्थानकातील नाल्याचा स्लॅब तुटलेला आहे. त्यामुळे बस ये-जा करण्यास अडथळा येतो. स्थानक आवारात पालीतील नाले व गटारांतील सांडपाणी येते.

त्यामुळे येथे खूप दुर्गंधी पसरली आहे. स्थानकात मोठाले खड्डे पडले आहेत. परिणामी सांडपाणी व पावसाचे पाणी खड्ड्यांत तुंबते. यामुळे येथून मार्ग काढणे किंवा एसटीमध्ये चढणे व उतरणे प्रवाशांसाठी दिव्य ठरत आहे. वृद्ध व महिलांचे तर प्रचंड हाल होत आहेत. शिवाय तात्पुरती बांधण्यात आलेली प्रवासी शेड छोटी असल्याने मुसळधार पाऊस आल्यास प्रवाशांना उभे राहायलासुद्धा जागा होत नाही. त्यांची खूप गैरसोय होते. प्रवाशांना पिण्यासाठी पाणीदेखील नाही. अशा प्रकारे पाली बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.


पाली बसस्थानकाची अशी दुरवस्था होणे ही बाब खेदजनक आहे. येथील खड्डे, चिखल व पाण्यामुळे प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. याबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहेत.

– शुभम बुटाला, अभियंता, पाली



स्थानकाचे नूतनीकरण व येथील समस्या मार्गी लावण्यासाठी अनेकदा उपोषण केले आहे. बुधवारी (ता.13) परिवहन मंडळाच्या कार्यकारी अभियंत्या व परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक रायगड आणि इतर अधिकार्‍यांनी स्थानकातील परिस्थिती पाहिली व ठोस कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

– रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, पाली
Exit mobile version