| धम्मशील सावंत । पाली/बेणसे |
कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर आलेय. राज्य शासनाने शासन निर्बंध शिथिल केले. धार्मिक स्थळे व मंदिरे दर्शनासाठी खुली केली. अशातच महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ क्षेत्रापैकी आयएसओ मानांकन प्राप्त प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली शहरात या वर्षातील पहिल्या अंगारक संकष्टी चतुर्थीला मंगळवारी (ता.19) बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक पहाटेपासून दाखल झाले होते.
त्यामुळे मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते. हे बाप्पा बल्लाळेश्वरा सर्वाना सुखी ठेव, कोरोनाला दूर ठेव.अशी आर्त विनवणी भाविक भक्तगणांनी गणरायाला केली असल्याचे अनेक भाविकांनी यावेळी सांगितले. रायगड जिल्ह्यासह मुंबई, नवीमुंबई, ठाणे, पुणे, पट्ट्यातून भाविक भक्तगण बाप्पा गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोठ्या भक्तीभावाने दाखल झाल्याचे पहावयास मिळाले. उन्हाळी सुट्या तसेच सलग लागून आलेल्या सुट्ट्या यामुळे गणेशभक्तांनी अष्टविनायक दर्शनाचा बेत आखला. त्यामुळे पालीत अंगारकीला भक्तांचा मळा फुलून निघाला.
दर्शनासाठी येणार्या भाविकांना उत्तम प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी बल्लाळेश्वर देवस्थानने नीटनेटके नियोजन केले होते. याठिकाणी विविध प्रकारची दुकाने देखील सजली होती. शिवाय मंदिर परिसरात रानमेवा विक्रीसाठी बसलेल्या आदिवासी बांधवांचा देखील धंदा तेजीत होता. कोरोनानंतर दोन पैसे हाती आल्याने आदिवासी बांधव देखील समाधानी झाल्याचे पहावयास मिळाले.भाविक व स्थानिकांच्या वाहनांमुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र वाहतूक पोलीस व देवस्थान ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडवीत होते. पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काईनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात व मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, वैभव आपटे, प्रमोद पावगी,अरुण गद्रे,अमोल साठे आणि डॉ. पिनाकीन कुंटे यांच्या मार्फत भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.
वर्षातील पहिली अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आले होते. आम्ही देखील चांगल्या दर्जाच्या वस्तू ग्राहकांना देण्यासाठी सज्ज होतो, अनेकांनी चांगली खरेदी देखील केली. व्यवसाय चांगला झाला.
प्रेषित साठे, व्यावसायिक, बल्लाळेश्वर मंदिर
देवस्थान ट्रस्टने भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत. देवस्थानचे दोन भक्त निवास नाममात्र दरात भाविकांसाठी उपलब्ध केले आहेत. बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आरोचे शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग, मांडव व शेड उभारण्यात आली आहे.
जितेंद्र गद्रे, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली