पाली खोपोली राज्य महामार्ग बनलाय जीवघेणा

पाली प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी; अपघाती घटनांत कमालीची वाढ
| पाली/बेणसे । वार्ताहर ।

वाकण पाली खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरण कामाला वेग आला आहे. अशातच रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने या मार्गावरून जाणार्‍या येणार्‍या वाहनांचा वेग देखील वाढला आहे. पाली खोपोली राज्य महामार्ग जीवघेणा बनला आहे. पाली शहराच्या प्रवेशद्वाराजवळ येणार्‍या वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघाती घटनांत कमालीची वाढ झाली आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्याची मागणी केली जातेय. प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा असे आवाहन जनतेतून केले जातेय.


महाराष्ट्रातील अष्टविनायक धार्मिक स्थळांपैकी पालीतील बल्लाळेश्‍वर धार्मिक स्थळ प्रसिद्ध आहे. येथे दर्शनासाठी राज्य व देशभरातुन भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येत जात असतात. शिवाय पाली सुधागड तालुक्याचे मुख्यालय असल्याने शासकीय निमशासकीय कामांसाठी नागरिकांची वर्दळ सुरू असते. अशातच सद्यस्थितीत वाकण पाली खोपोली रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहने अमर्याद वेगाने येतात, काही वाहने पालीत शिरतात तर काही वाहने वेगाने सरळ पुढे जातात, यावेळी वाहनांची ठोकर होऊन अपघाती घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सलग तीन दिवसात याठिकाणी चार ते पाच अपघाती घटना घडल्या आहेत. प्रशासनाने याप्रश्‍नाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

पाली प्रवेशद्वारा जवळ दोन्ही बाजूला गतिरोधक बसवावेत व याठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी करावी.

अरविंद फणसे व गणेश कदम, सामाजिक युवा कार्यकर्ते
Exit mobile version