सोनी मराठी वाहिनीवरील कलावंतांची उपस्थिती
| पाली | विशेष प्रतिनिधी |
अमाप उत्साहात आणि हजारो महिलांच्या साक्षीने शनिवारी (21 जानेवारी) श्रीक्षेत्र पाली येथे बल्लाळेश्वर नगरीत कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा साजरा झाला. यावेळी सोनी मराठी वाहिनीवरील कलावंतांनी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावली होती.त्या कलाकारांना प्रत्यक्षात बघून महिला प्रेक्षकांचा चेहरा आनंदाने फुलून गेला. शेकाप महिला आघाडीप्रमुख, कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने अलिबागबरोबरच जिल्ह्यात विविध ठिकाणी हळदीकुंकू सोहळा आयोजित करुन महिलांचा यथोचित सन्मान केला जात आहे. गेल्या बुधवारी अलिबागमध्ये दिमाखात पार पडलेल्या हळदीकुंकू सोहळ्यानंतर शनिवारी पालीमध्येही मराठा समाज हॉलमध्येही महिलांसाठी हळदीकुंकू सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिवाची होतिया काहीली मालिकेतील राज हंचनाळे, प्रतिक्षा शिवणकर, गाथा नवनाथमधील मच्छिंद्रनाथांची भूमिका करणारे जयेश शेवलकर, प्रतिशोध मालिकेतील अक्षय वाघमारे आणि पायल मेमाणे हे उपस्थित होते.नेहमी चॅनेल्सवर विविध भूमिका साकारणारे कलावंत प्रत्यक्षात समोर बघताना महिलावर्ग कमालीचा आनंदित झाल्याचे दिसत होते.या कलावंतांसमवेत महिलानी सेल्फी काढून घेत आनंद द्विगुणीत केला.
या कलावंतानीही उपस्थित महिलांनी संवाद साधताना मालिकेतील भूमिकांची झलकही उपस्थितांना दाखविली.या सोहळ्यास जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे यांच्यासह पालीतील विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून उपस्थित होते.कृषीवल परिवारातर्फे चित्रलेखा पाटील यांनी या सर्वांचे यथोचित स्वागत करण्यात आले.







