नागरिकांची गैरसोय, कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा भार
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण पाली आहे. मात्र येथील सब पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचार्यांची वानवा आहे. येथे 1 पोस्ट मास्टर व 4 क्लार्क या पाच जागा रिक्त आहेत. परिणामी उपलब्ध कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. तसेच लवकर काम न झाल्याने नागरिकांना एका कामासाठी सुद्धा कित्येक तास खोळंबावे लागते. शिवाय अपुर्या सोयी सुविधांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
येथील आधार कार्ड नोंदणी केंद्र अपुर्या सेटअपमुळे गेली अनेक महिने बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांना आधार कार्ड नोंदणी अपडेट करता येत नाही. तसेच मागील दीड वर्षांपासून येथील जनरेटर बंद पडले आहे. परिणामी वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पोस्ट ऑफिसमधील सर्व काम ठप्प होत आहेत. पावसाळ्यात वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे यावेळी नागरिकांची कामे खोळंबू नये यासाठी पाली पोस्ट ऑफिसमध्ये जनरेटरची सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. म्हणून लवकर जनरेटर दुरुस्त करावा अशी मागणी अॅड.नोवेल चिंचोलकर यांनी केली आहे.
पाली उप डाकघर कार्यालयातील आधारकार्ड नोंदणी केंद्रात अपुर्या वस्तूंअभावी बंद आहे. त्या संदर्भात व रिक्त पदांसंदर्भात अनेकवेळा जिल्हा पोस्ट कार्यालयात पत्रव्यवहार केला आहे. मात्र अजूनही त्याची दखल घेतली गेली नाही. कार्यालयातील बंद अवस्थेत असलेला जनरेटर लवकरच सुरू करण्यात येईल.
सरोजा रुमडे, पोस्ट मास्तर, पाली