पालीकर वाहतूक कोंडीने बेजार

वाहतूक कोंडीवर बाह्यवळण मार्ग पर्याय

| पाली/बेणसे | वार्ताहर |

अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात वाहतूक कोंडीमुळे येथील नागरिक व भाविक अक्षरशः बेजार झाले आहेत. येथील बाह्यवळण मार्गाला मान्यता मिळून 13 वर्षे होत आली आहेत, मात्र अनेक अडचणीमुळे त्याला पूर्ण होण्यास अजून काही मुहूर्त सापडलेला नाही. बाह्यवळण मार्ग झाल्यास येथील वाहतूक कोंडीची समस्या बहुतांशी सुटेल. मागील नऊ वर्षांपासून या संदर्भात जनतेतून मागण्यांचा रेटा आहे, मात्र सरकारला काही केल्या जाग येत नाही.

पालीत नेहमीच भाविकांची गर्दी असते. त्यातच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रोज हजारोच्या संख्येने भाविक व त्यांची वाहने पालीत दाखल होत आहेत. त्याबरोबरच पाली हे तालुक्याचे ठिकाण आहे. परिणामी अनेक लोक कामानिमित्त व विद्यार्थी शाळा व कॉलेजमध्ये येत असतात. त्यातच अरुंद रस्ते, अवजड डंपर वाहतूक, अवैधरीत्या पार्क केलेली वाहने व अनधिकृत बांधकामे यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. परिणामी वाहनचालक, भाविक, पादचारी व विद्यार्थ्यांची येथून वाट काढताना मोठी गैरसोय होत आहे.

येथील बल्लाळेश्वर मंदिर, ग.बा. वडेर हायस्कूल, जुने एस.टी.स्टँड, गांधी चौक, मारुती मंदिर, बाजारपेठ, हाटाळेश्वर चौक, मारुती मंदिर अशा बहुतांश ठीकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. असंख्य कारणांमुळे पोलिसांनी या वाहतुक कोंडीवर नियंत्रण मिळविणे अवघड होते. मंदिर परिसरात देवस्थानचे सुरक्षा रक्षक देखील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी तैनात असतात. अनेक वेळा वाहतूक कोंडीमुळे रुग्णांना तसेच रुग्णवाहिकेस रुग्णालयात पोहोचण्यास उशिर होतो. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून बाह्यवळण मार्ग लवकर करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांकडून वारंवार होत आहे.

पालीतील प्रवेश करणारे व बाहेर जाणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. काही ठिकाणचे अनधिकृत बांधकाम देखील हटवले आहे. बाह्यवळण मार्ग झाल्यास पाली शहरातील वाहतूक सुरळीत होईल. शिवाय भाविकांची वाहने व अवजड वाहतूक शहराबाहेरून होईल. याबरोबरच पर्यटन, रोजगार व विकासाच्या नव्या वाटा निर्माण होतील. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. वाहन चालकांनी देखील वाहतुकीचे नियम पाळावे.

प्रणाली सूरज शेळके, नगराध्यक्ष, नगरपंचायत, पाली

भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हा प्रस्ताव भूसंपादन अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जमिनीच्या किमती निर्धारित केल्या जातील आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांना ठरलेली रक्कम देण्यात येईल. व मार्गाच्या कामाला सुरुवात होईल.

दिलीप मदने, शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, पाली सुधागड

बाह्यवळण मार्ग
सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आखत्यारीत हा मार्ग होणार आहे. राज्यशासनाने सन 2010 या वर्षी या रस्त्याला मान्यता दिली आहे. तसेच त्यावेळी रस्त्यास 18 कोटी तर भूसंपादनासाठी 10 कोटींची मंजुरी मिळाली होती. सदरचा मार्ग वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग 548(ए) व पाली पाटणूस राज्यमार्ग 94 ला जोडला आहे. यासाठी बलाप, पाली, बुरुमाळी व झाप या गावातील एकूण 9 हेक्टर जागा लागणार आहे.

कोंडी सुटेल
पाली गावातील रस्ते रुंदिकरण होणे अवघड आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाह्यवळण रस्ता काढणे हा एकमेव पर्याय आहे. बाह्यवळण मार्ग लवकर सुरु व्हावा यासाठी फारसे कोणी पाठपुरावा करतांना दिसत नाही. बाह्यवळण मार्ग झाल्यास मोठ्या गाड्या पालीत येणारच नाहीत. त्यामूळे बरीचशी वाहतूक कोंडी कमी होईल. बलाप गावावरुन थेट बल्लाळेश्वर मंदिराच्या पाठीमागे झाप गावाजवळ बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी देखिल मिळाली आहे. परंतू हा पर्यायी मार्ग अजूनही लालफितीत अडकला आहे.

Exit mobile version