पालीकर शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत

सरकारे बदलली समस्या कायम राहिली

| पाली/बेणसे । वार्ताहर ।

‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय पालीकर जनतेला अनुभवयास मिळाला आहे. पिढ्यानपिढ्या येथील जनतेला दूषित व गढूळ पाणी प्यावे लागते आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहराला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प पालीत उपलब्ध नाही. तसेच तब्बल 37 कोटींची शुद्धपाणी योजना देखील लालफितीत अडकलेली आहे. परिणामी भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. या प्रदूषित पाण्याने नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळाच्या पाण्यातून साप, बेडूक, शंखशिंपले व मासे आदी प्राणी आले आहेत. याबरोबरच शेवाळ, चिखल हे नेहमीच येत असते. आजूबाजूच्या कारखान्यांतून प्रदूषित पाणी देखील अंबा नदीमध्ये सोडले जाते. असे प्रदूषित व घाण पाणी नाईलाजाने लोकांना वापरावे लागते आहे. अनेक नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका व विहीरीचे पाणी पिण्यावर भर देत आहेत. बहुतांश जण विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरून देखील लोकांना असे प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने प्रदूषित पाण्यापासून आमची सुटका करावी असा सुर नागरिकांमधून उमटत आहे.

नळपाणी योजना लालफितीत
शासनाने केलेल्या 2008 -09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाखाचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू राजकीय श्रेयवादामध्ये हि योजना रखडली गेली. त्याबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्‍न देखिल होता. मात्र पालीला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. सध्य स्थितीत ही योजना 37 कोटींवर गेली आहे.

पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गीता पारलेचा यांच्या नेतृत्वाखाली शहर विकास आराखडा तयार करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या आराखड्यामध्ये प्रामुख्याने पाली शहराला शुद्ध जल पुरवठा करण्याकरिता नवीन योजनेचा प्रस्तावा बाबतचे काम सुरू आहे. लवकरात लवकर पालीकरांचा शुद्ध पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

अरिफ मनियार,
उपनगराध्यक्ष, पाली नगरपंचायत
Exit mobile version