उत्कर्ष सह अन्य विद्यार्थ्यांनाही सुरक्षित भारतात आणण्याची मागणी
| पाली/बेणसे धम्मशील सावंत |
मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पालीतील एक कुटुंब अक्षरशः भीतीच्या छायेत दिवस काढत आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती चिघळली असून इराणकडून प्रत्युत्तरातदाखल कारवाया झाल्याच्या बातम्यांमुळे दुबईतही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाली पोलीस ठाणे हद्दीतील राजेश मपारा यांचा मुलगा उत्कर्ष राजेश मपारा हा दुबईत शिक्षणासाठी गेलेला असून, सध्या तेथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी सागर पाठक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
उत्कर्ष हा दुबई इंटरनॅशनल अकॅडमिक सिटी परिसरातील एसपी जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सध्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे काही भागांत हालचालींवर निर्बंध लागू करण्यात आल्याचे समजते. क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या बातम्या, सतत बदलणारे वातावरण आणि अनिश्चिततेची छाया यामुळे पालकांची चिंता शिगेला पोहोचली आहे.
घटनेची माहिती मिळताच वडील राजेश मपारा यांनी पाली पोलीस ठाण्यात मुलाची सविस्तर माहिती दिली असून, प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. “उत्कर्ष आमच्या काळजाचा तुकडा आहे. आम्ही त्याच्याशी वायफाय, इंटरनेटच्या माध्यमातून सतत संपर्कात आहोत. पण, परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते आहे. दुबईत क्षेपणास्त्र पडल्याच्या बातम्या ऐकून आमचा जीव घाबरतो. तोही मनातून घाबरलेला आहे. बाहेर पडू देत नाहीत, वारंवार सूचना दिल्या जात आहेत. आम्ही पालक म्हणून प्रचंड चिंतेत आहोत,” असे भावनिक शब्दांत राजेश मपारा यांनी सांगितले.
उत्कर्ष ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे, तेथे मुंबई-पुण्यासह भारतातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर अनेक घरांची धडधड वाढली आहे. “अशा युद्धजन्य परिस्थितीत मुलांना परदेशात ठेवणे किती सुरक्षित आहे, हा प्रश्न सतावत आहे. उत्कर्षसह सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणावे,” अशी मागणी पालकांकडून होत आहे.
आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना उत्कर्ष मपारा म्हणाला, “आम्हाला घरातच राहून खबरदारी घ्यायला सांगितले आहे. कोणतीही अडचण आली तर त्वरित संपर्क साधा, असे एमबीसीकडून कळविण्यात आले आहे. हल्ले आमच्यापासून दूर असले तरी मनात भीती आहे. अनेक भारतीय विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. सध्या अभ्यासक्रम ऑफलाईनऐवजी ऑनलाईन करण्यात आला आहे.”
मध्यपूर्वेतील तणावानंतर परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची अधिकृत नोंद, आपत्कालीन संपर्क व्यवस्था, तातडीची स्थलांतर योजना याबाबत स्थानिक प्रशासन किती सज्ज आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रत्येक वेळी पालकांनाच धावपळ करावी लागणार का, अशी खंतही व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही केवळ कुटुंबीयांची नव्हे, तर शासनाचीही जबाबदारी असल्याची जाणीव संबंधित यंत्रणांनी ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुबईमध्ये शिक्षणानिमित्त अथवा पर्यटन निमित्त कोणी अडकून पडले असेल तर त्यांना सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन राज्य सरकारच्या संपर्कात आहे. जिल्हा प्रशासनाने सोशल मीडियावर यासंबंधी पोस्ट शेअर केली आहे. संबंधित पालकांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने माहिती कळवावी.
संदेश शिर्के,
निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड






