पालीत मेणबत्ती,सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला आग

आग विझविण्यासाठी सामूहिक प्रयत्न
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
पालीतील खालचा मोहल्ला तसेच कुंभारआळी जवळील भर वस्तीत असलेल्या मेणबत्ती व सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला मंगळवारी (दि. 3) दुपारी भीषण आग लागली. ही भयानक आग विझविण्यासाठी परिसरातील सर्वांनी एकत्र येऊन आटोकाट प्रयत्न केले.
ही आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. मात्र आगीमुळे कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला आहे. लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा कारखाना भरवस्तीत असल्याने आजूबाजूच्या घरांना व लोकांना या आगीची झळ पोहोचली. यावेळी नागरिकांनी कारखाना मालकावर संताप व्यक्त केला. भरवस्तीतील हा कारखाना इतरत्र हलविण्यात यावा अशी मागणी वारंवार येथील रहिवाशांनी केली आहे. नागरिकांनी प्रसंगावधानता दाखवून ताबडतोब आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. जवळपास निम्म्याहून अधिक आग नागरिकांनी विझवली. नंतर सुप्रीम पेट्रोकेमिकल्स, रिलायन्स कंपनी रोहा एमआयडीसी मधून अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी उर्वरित आग विझवली. यावेळी पाली पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार दिलीप रायण्णावार, पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काईंगडे, जिप सदस्य सुरेश खैरे व रवींद्र देशमुख, नगराध्यक्षा गीता पालरेचा, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, नगरसेवक गणेश सावंत व सुलतान बेनसेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version