पालीत भरली शाळेबाहेरची शाळा

रेडिओ कार्यक्रमात विद्यार्थिनी साधला आईशी संवाद
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, प्रथम एजुकेशन फाउंडेशन आणि आकाशवाणी केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेबाहेरची शाळा हा रेडिओ कार्यक्रम राबविला जातो. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातून एकमेव दुर्गम भागातील राजीप कार्ली शाळेची विद्यार्थिनी तेजस्वी धाडवे व तिच्या आईचा सहभाग होता. दोघींनी फोनद्वारे संवाद साधला.

दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी शाळेबाहेरची शाळा हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील इ.1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. लॉकडाऊन मुळे आकाशवाणीवरून अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमार्फत अभ्यास पोहचविणे अपेक्षित असते. आज दिलेल्या अभ्यासावर पुढील कार्यक्रमात सकाळी 10: 35 वा. आकाशवाणीच्या नागपूर अ (512.8) केंद्रावरून प्रसारित केल्या जाणार्‍या कार्यक्रमात रेडिओ जॉकी रेश्मा सोबत गप्पा व इतर उपक्रम असे स्वरूप असते.

मागील भागात विचारलेल्या आजोबाच्या लग्नाच्या वर्षी शेतमजुरी किती व कशा स्वरूपात मिळत होती? या प्रश्‍नावर तेजस्वीने 2 रुपये किंवा 2 पायली तांदूळ असे उत्तर शोधून काढल्याचे सांगितले. तसेच धरतीची आम्ही लेकरं ही कविता वाचून दाखवली. यावेळी तिने मोठेपणी शिक्षक होणार असल्याचे सांगितले. व आणखीही विविध गोष्टींवर गप्पा मारल्या. या कार्यक्रमात सहभागी झाल्याने खूप मज्जा आली असे तेजस्वी ने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


दुर्गम भागातील आमच्या विद्यार्थिनीला या कार्यक्रमात संधी दिल्याबद्दल आकाशवाणी व प्रथम संस्थेचे धन्यवाद. शाळा बंद असण्याच्या काळात विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळावी व शिक्षणात खंड पडू नये यासाठी या सारखे पूरक उपक्रम प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेत. तसेच याचा लाभ घेण्यासाठी दुर्बल व वंचित गटातील विद्यार्थ्यांना एंड्रॉईड मोबाईल वा टॅब मिळाले पाहिजेत.
मोहन भोईर, शिक्षक, राजीप कार्ली शाळा

Exit mobile version